CoronaVirus Lockdown : मराठा कॉलनी पूर्वपदावर, जीवनावश्यक वस्तू घरपोहोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:59 PM2020-04-09T17:59:35+5:302020-04-09T18:03:02+5:30
कोरोनाबाधित महिला आढळून आल्यामुळे धसका घेतलेल्या मराठा कॉलनी व परिसरातील रहिवाशांच्या मनावरील ताणतणाव हळूहळू कमी होत असून, तेथील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. पोलीस प्रशासन तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी घरपोहोच सेवा देण्यास सुरुवात केल्यामुळे रहिवाशांची गैरसोय देखील टळली आहे.
कोल्हापूर : कोरोनाबाधित महिला आढळून आल्यामुळे धसका घेतलेल्या मराठा कॉलनी व परिसरातील रहिवाशांच्या मनावरील ताणतणाव हळूहळू कमी होत असून, तेथील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. पोलीस प्रशासन तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी घरपोहोच सेवा देण्यास सुरुवात केल्यामुळे रहिवाशांची गैरसोय देखील टळली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचे तीन रुग्ण सापडल्यानंतर आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे तपासणी अहवाल निर्दोष आल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच सोमवारी कसबा बावडा परिसरातील दाट वस्ती असलेल्या मराठा कॉलनीत एक महिला कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले; त्यामुळे परिसरातील रहिवाशांसह जिल्हा प्रशासन देखील हडबडून गेले; पण याही परिस्थितीतून सर्वजण सावरत आहेत. त्यांच्यात आता धीर आला आहे; पण मराठा कॉलनी, साई कॉलनी, श्री कॉलनीसह अन्य परिसर क्वारंटाईन करण्यात आला असून, लोकांना घराबाहेर पडण्यास पूर्णत: मज्जाव करण्यात आला आहे.
दोन दिवस प्रचंड तणाव तसेच दडपणाखाली गेल्यानंतर मात्र तेथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. पोलीस, महापालिका तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून कोणाची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे.
क्वारंटाईन परिसरात दूध, औषधे, धान्य, गॅस अशा वस्तूंचा पुरवठा बुधवारपासून सुरू झाला. गुरुवारी भाजीची खूपच गरज असल्याची माहिती कळताच महापौर निलोफर आजरेकर, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी तीन टेम्पो भरून भाजी तेथे पाठविली. वांगी, दोडका, कोबी, टोमॅटो, ढबू, गाजर, बीट, मिरच्या अशा प्रकारची भाजी घरोघरी जाऊन मोफत वाटण्यात आली. शौकत बागवान, फिरोज बागवान, मुस्ताक फरास, रफिक बालम बागवान, बाबूराव कांडेकर, इर्शाद बागवान, सर्फराज लष्करे बागवान ही मंडळीही मदतीला धावून आली.
सदरची भाजी हातात मास्क आणि हँड ग्लोजचा वापर आणि हँड सॅनिटायझयरचा वापर करत, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत नामदेव ठाणेकर, आर्शिल मुजावर, रोहित ठाणेकर, कपिल पुंगावकर, कुमार ठाणेकर, विष्णू जाधव, बंडू पुंगावकर, शिवाजी जाधव, ओंकार पाटील, मोहित मंदारे, सचिन माळी, सचिन पाटील, पोलीस कर्मचारी किरण वावरे, संदीप जाधव, दिग्विजय चौगले, दिगंबर साळोखे यांनी अतिशय शिस्तबद्धरीत्या प्रत्येक घरात वितरीत केली.