corona in kolhapur -रेड झोनमधून येणाऱ्यांचा सक्तीने स्वॅब आणि संस्थात्मक अलगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 07:54 PM2020-05-09T19:54:04+5:302020-05-09T19:57:56+5:30
रेड झोन असणाऱ्या जिल्ह्यांमधून कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सक्तीने स्वॅब घेऊन त्याला संस्थात्मक अलगीकरण करा. त्याचबरोबर खासगी हॉटेल, आस्थापनामध्ये अलगीकरण करुन त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
कोल्हापूर : रेड झोन असणाऱ्या जिल्ह्यांमधून कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सक्तीने स्वॅब घेऊन त्याला संस्थात्मक अलगीकरण करा. त्याचबरोबर खासगी हॉटेल, आस्थापनामध्ये अलगीकरण करुन त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रांताधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, समन्वयक संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, विक्रांत चव्हाण, हेमंत निकम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, काही बाबतीत सूट दिली याचा अर्थ पूर्णपणे शिथीलता दिलीय असे नाही. पेट्रोलिंग वाढवून लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यार दंडात्मक कारवाई करा. अजिबात न ऐकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा.
पोलीस उप अधीक्षकांनी दररोज तपासणी नाक्यांना भेट द्यावी
जिल्ह्यातील २० तपासणी नाक्यांवरुन परवानाधारक जिल्ह्यात प्रवेश करतात. अशा ठिकाणी पोलीस उप अधीक्षकांनी दररोज भेट देवून पाहणी करावी. विनापरवाना कुणी येत असेल तर त्याला परत पाठवा. तपासणी नाक्यांवरुन प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी झालीच पाहिजे. त्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. पास घेवून येणारी व्यक्ती दवाखान्यात जाते का याची खातरजमा करा, असेही देसाई म्हणाले.
पासचा गैरवापर झाल्यास कारवाई
मुंबई-पुणे येथून येणाऱ्यांसाठी अद्याप परवानगी दिली नाही. मुंबई आणि पुणे येथून बाहेर जाण्यासाठी पोलीस विभागाकडून पास देण्यात येत आहेत. वैद्यकीय उपचार, अंत्यसंस्कार अशी कारणे सांगून पोलीसांकडून असे पास घेण्यात येत आहेत. या पासव्दारे जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहेत. अशा पासचा गैरफायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
पोलीसांनी अशा पासची काटेकोरपणे पडताळणी करावी आणि गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. त्याचबरोबर बाहेरुन येणाऱ्या अशा व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवा.
सध्याचे संस्थात्मक अलगीकरण केंद्रांची क्षमता संपल्यानंतर हॉटेल तसेच खासगी आस्थापना ताब्यात घेऊन त्यामध्ये अशा व्यक्तींना ठेवा आणि त्याचा खर्च संबंधित व्यक्तींकडून वसूल करण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
माल वाहतूक वाहनांसाठी काम करत असणाऱ्या वाहक-चालकांची त्या-त्या आस्थापनांने त्यांच्या राहण्याची स्वतंत्र सोय करावी. ग्राम समिती, प्रभाग समितीने बाहेरुन गावात येणाऱ्या व्यक्तींवर पूर्ण नियंत्रण ठेवावे, असे ही जिल्हाधिकारी देसाई म्हणाले
कोव्हीड केअर सेंटर सुविधाजनक बनवा
प्रत्येक तालुक्याला कोव्हीड केअर सेंटर करण्यात आले आहे. या ठिकाणी अधिक सुविधा, उपकरणे कशी देता येतील याची जबाबदारी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी घ्यावी. या ठिकाणी येणाऱ्या अडचणींसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क करा.
https://kolhapuriwarriors.com/join वर सहभाग नोंदवा
प्रत्येक तालुक्याला आवश्यक असणारी मदत ही व्यक्ती, सामाजिक संस्था यांच्याकडून देणगीरुपाने घ्यावी. त्यासाठी https://kolhapuriwarriors.com/join हे संकेतस्थळ निर्माण करण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येक मदतीची नोंद यावर घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, सॉनिटायझर देवून त्यांची काळजी घ्या. त्यांच्या राहण्याची-जेवणाची व्यवस्था करावी, असेही ते म्हणाले.
मी जरी सांगितलं.. तरी परत पाठवा
विना परवाना कुणी जिल्ह्यात प्रवेश करत असेल तर त्याला परत पाठवा. त्याविषयी कुणाचाही फोन आला तरी ऐकू नका. मी जरी फोन केला तरीदेखील त्याला परतच पाठवा. आपल्याला जिल्ह्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे, असे ही जिल्हाधिकारी देसाई म्हणाले.
महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, शहरातील ४४ झोपडपट्टयांमध्ये विशेष काळजी घेण्यात येत आहे. शहरात संस्थात्मक अलगीकरण केंद्रांची संख्या वाढवतोय. अत्यावश्यक वाहतूक सेवेत असणाऱ्या चालक-वाहक आणि हमाल यांची वेगळी सुविधा करण्याबाबत त्यांच्या असोशिएशनशी चर्चा करत आहोत. बाहेरुन येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व्हेक्षण पथक वाढविण्यात आले असून थर्मल स्कॅनिंगवर भर देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्याच्या सिमेवर अधिक लक्ष द्या. इचलकरंजी मधील नदीवेस येथील रुग्ण प्रकरणात काँटॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्या. कंटेन्मेंट झोनला एकाच ठिकाणी मार्ग ठेवावा. बाहेर पडणारी वाहनेही निर्जंतुकीकरण झाली पाहिजेत याची दक्षता घ्या.
येणाऱ्या ईदच्या निमित्तानेही सतर्क रहा. कोणतेही धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम होणार नाहीत. शहरी भागात दुचाकी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. डबलशिट असणाऱ्यांवर कारवाई करा. विना मास्क, सामाजिक अंतरचे उल्लंघन यासाठी फोटो काढून व्हाटस अॅपवर मागवून कारवाई शहरी भागात काही ठिकाणी सुरु आहे, ती अधिक प्रभावी इतरांनीही करायला हरकत नाही, असेही ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल म्हणाले, बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण करा. त्यांना घरचे जेवण योग्य काळजी घेवून देवू शकता. को मॉरबॅलिटी असणाऱ्या व्यक्तींना फिल्डवर पाठवू नका. काँटॅक्ट ट्रेसिंग चांगल्या पध्दतीने करा. कोव्हीड केअर सेंटरमध्ये स्वाब कलेक्शन सुविधा, थर्नमल स्कॅनिंग या सुविधा हव्यात. हेल्थ स्क्रिनिंगला अधिक महत्व द्या. नरेगाच्या कामांना प्राधान्य द्या. विभाग नियंत्रक रोहन पलंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी यावेळी संवाद साधून माहिती दिली.