corona in kolhapur-कोरोनाच्या मुकाबल्यासाठी 'गडहिंग्लज पालिका' सज्ज..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 07:26 PM2020-03-26T19:26:02+5:302020-03-26T19:27:15+5:30

'कोरोना'चा मुकाबला करण्यासाठी गडहिंग्लज नगरपालिका सज्ज झाली आहे. शहरातील सर्व प्रभागात भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. रस्ते - गटारींची दैनंदिन सफाई, कचरा उठाव, डास निर्मूलनासाठी औषध फवारणी आणि स्वच्छ व शुद्ध पाण्याचा मुबलक पुरवठा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

corona in kolhapur - 'Gadhinglaj Municipality' ready to face Corona ..! | corona in kolhapur-कोरोनाच्या मुकाबल्यासाठी 'गडहिंग्लज पालिका' सज्ज..!

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गडहिंग्लज शहरातील प्रत्येक प्रभागात डास निर्मूलनासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे.(मजीद किल्लेदार )

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या मुकाबल्यासाठी 'गडहिंग्लज पालिका' सज्ज..!

गडहिंग्लज : 'कोरोना'चा मुकाबला करण्यासाठी गडहिंग्लज नगरपालिका सज्ज झाली आहे. शहरातील सर्व प्रभागात भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. रस्ते - गटारींची दैनंदिन सफाई, कचरा उठाव, डास निर्मूलनासाठी औषध फवारणी आणि स्वच्छ व शुद्ध पाण्याचा मुबलक पुरवठा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

परदेशातून आणि मुंबई, पुणे आदी कोरोनाचा संसर्ग झालेल्या शहरातून गडहिंग्लज मध्ये आलेल्यांचा घरोघरी जाऊन शोध घेतला जात आहे, त्यासाठी प्रत्येक प्रभागाकरिता दोन अधिकारी नेमण्यात आले आहेत.या संदर्भातील पाहणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना संसर्गित शहरातून गडहिंग्लजमध्ये आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना आपापल्या घरातच स्वतंत्र राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.परंतु, त्यापैकी काही मंडळींकडून त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.अशांसाठी गडहिंग्लज शहरात दोन ठिकाणी सक्तीची विलगीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

नगरपालिकेतर्फे आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करवून घेण्यात आली आहे.त्यांना मास्क, सॅनिटायझर , साबण आदी वस्तु पुरविण्यात आल्या आहेत.स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात त्यांना विशेष. सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरी, उपनगराध्यकक्षा शकुंतला हातरोटे व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेची यंत्रणा कोरोनाचा यशस्वी सामना करण्यासाठी झटत आहे.

घंटागाडीवरून आवाहन...!

कोरोनाचा संसर्ग आणि फैलाव रोखण्यासंदर्भातील आवाहन कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीवरील लाऊडस्पिकरवरून करण्यात येत असून वाहनांचे हॅण्डबिल्सदेखील घरोघरी वाटण्यात येत आहेत.

'त्यांचा' कचराही वेगळा...!

परदेशातून गडहिंग्लज शहरात आलेल्या ९ कुटुंबातील १५ नागरिकांना सक्तीने 'होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे.त्या ९ घरातील कचरादेखील स्वतंत्रपणे जमा करून त्याची विल्हेवाट शास्त्रीयपध्दतीने लावली जात आहे.

अंतर्गत वाहतूक बंद...!

प्रत्येक प्रभागातील लहान, मोठ्या गल्लीत दगड आणि लाकडी ओंडके लावुन नागरिकांनी गडहिंग्लज शहरातील बहुतेक अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी उत्स्फूर्तपणे
बंद केले आहेत.

गडहिंग्लज शहरात २३ ठिकाणी मिळणार भाजीपाला...!

गडहिंग्लज : संचारबंदीच्या काळात नागरिकांना भाजीपाला आपापल्या घरानजीक उपलब्ध व्हावीत यासाठी गडहिंग्लज नगरपालिकेने शहरातील ९ प्रभागात २३ ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्रे सुरू केली आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली.

घरपोच भाजीपाला देण्यासाठी अभिनव सामाजिक संस्था आणि अ‍ॅमिकस वेजेटिया या दोन संस्था पुढे आल्या आहेत. त्यांच्याकडून भाजीपाला खरेदी करता येणार आहे.त्याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी संपूर्ण शहरात मिळून एकूण २३ ठिकाणी भाजीपाला खरेदी - विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

काळभैरी रोडवरील मारुती मंदिर, भीमनगर कमान, निलकमल हॉटेल, पिराजी पेठ, शिवाजी चौक, पाटणे गल्ली, मुल्ला मस्जिद चौक, कोंडा बाजार, एम.आर.हायस्कूल , शिवाजी रोडवरील कदम मेडिकल, आझाद रोडवरील हिंदवी ग्रुप. कडगाव रोडवरील भगवा चौक शिवाजी विद्यालय, गांधीनगर येथील ऐरावती हॉटेल, सरस्वतीनगर, भूमी अभिलेख कार्यालय,आजरा रोडवरील राधाकृष्ण मंदिर, आयोध्यानगर कॉर्नर, मुलींचे हायस्कूल, मांगलेवाडी, हाळलक्ष्मी मंदिर, शेंद्री रोड बिरोबा मंदिर, भडगाव रोडवरील संकल्प नगर याठिकाणी भाजीपाला विक्री करण्यास व्यापारी व शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.त्या ठिकाणी गर्दी न करता नागरिकांनी भाजीपाला खरेदी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title: corona in kolhapur - 'Gadhinglaj Municipality' ready to face Corona ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.