corona in kolhapur -शहरातील अंतर्गत मार्ग केले बंद, पोलीस बंदोबस्त कडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 07:14 PM2020-03-26T19:14:21+5:302020-03-26T19:15:57+5:30
‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने कोल्हापूर शहरातील प्रमुख अंतर्गत मार्ग बंद करण्याचे नवे पाऊल गुरुवारपासून उचलले आहे. दिवसभर रस्त्यांवर तुरळक वाहतूक सुरू असली तरी त्यांच्याकडे पोलिसांमार्फत कसून चौकशी केली जात आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या वाहनधारकांची वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
कोल्हापूर : ‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने कोल्हापूर शहरातील प्रमुख अंतर्गत मार्ग बंद करण्याचे नवे पाऊल गुरुवारपासून उचलले आहे. दिवसभर रस्त्यांवर तुरळक वाहतूक सुरू असली तरी त्यांच्याकडे पोलिसांमार्फत कसून चौकशी केली जात आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या वाहनधारकांची वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ‘कोरोना’चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसला तरीही ‘कोरोना’ची प्रचंड धास्ती सर्वसामान्य नागरिकांत आहे. त्यामुळे भविष्यात कोणतीही गंभीर घटना उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली आहे. गेल्या चार दिवसांत पोलीस प्रशासनाने जनता कर्फ्यू, जमावबंदी, संचारबंदी, लॉकडाऊन अशा विविध माध्यमांतून जनतेला घराबाहेर पडण्यापासून रोखले आहे.
गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त शिथिल केल्याने जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले. त्यामुळे रस्त्यांवर काही प्रमाणात वर्दळ होती; पण त्यानंतर पोलिसांनी पुन्हा कडक धोरण अवलंबत विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांवर कारवाईचा बडगा अवलंबला.
प्रत्येक चारचाकी वाहनाची तपासणी केली जात आहे. दुचाकीचालकाला अडवून त्याच्याकडे विचारपूस केली जात आहे. विनाकारण फिरत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर हेल्मेट, विनानंबर प्लेट, अपुरी कागदपत्रे, आदींबाबत ६०० रुपये दंड आकारणी केली जात आहे.
दंड भरा कार्यालयात
शहरात कोणत्याही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्त करून त्यांना सुमारे ६०० रुपये दंडाची पावती हाती दिली जात आहे. त्यानंतर ही जप्त केलेली दुचाकी क्रेनद्वारे प्रिन्स शिवाजी पुतळ्यानजीक शहर वाहतूक शाखा व पोलीस उद्यान येथे ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांना दंडाची पावती घेऊन कार्यालयातच जाऊन दंड भरून दुचाकी ताब्यात घ्यावी लागत आहे.
मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील रस्ते बंद
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या बसस्थानक परिसरात दाभोळकर चौकाकडून परिख पुलाकडे जाणारे दोन्ही रस्ते, वटेश्वर मंदिरासमोर शिवाजी पार्कात जाणारा रस्ता, ताराराणी चौकाकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारा रस्ता, दाभोळकर चौक ते सासने मैदान, दाभोळकर चौक ते गोकुळ हॉटेल हे मार्ग बॅरिकेट्स लावून वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत.