corona in kolhapur -अवघी मराठा कॉलनी हादरली, पाचशे मीटर परिसर क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 07:23 PM2020-04-06T19:23:54+5:302020-04-06T19:25:40+5:30
कसबा बावड्यातील भगव्या चौकातून डावीकडील असलेल्या मराठा कॉलनीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खडबडून जागी झाली आणि सगळी यंत्रणा पाच ते सहा मिनिटांत प्रत्यक्ष जागेवर पोहोचली तेथेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन व आदेशही झाले. तत्काळ आदेशाची अंमलबजावणी देखील सुरू झाली. मात्र, या प्रकाराने संपूर्ण कॉलनी हादरून गेली. रहिवाशी चिडीचूप झाले.
कोल्हापूर : कसबा बावड्यातील भगव्या चौकातून डावीकडील असलेल्या मराठा कॉलनीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खडबडून जागी झाली आणि सगळी यंत्रणा पाच ते सहा मिनिटांत प्रत्यक्ष जागेवर पोहोचली तेथेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन व आदेशही झाले. तत्काळ आदेशाची अंमलबजावणी देखील सुरू झाली. मात्र, या प्रकाराने संपूर्ण कॉलनी हादरून गेली. रहिवाशी चिडीचूप झाले.
जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे सीईओ अमल मित्तल सोमवारी सकाळच्या सत्रातील आपापली कामे आटोपून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. दुपारी कार्यालयातच डबे मागवून घेऊन जेवण आटोपले. त्याचवेळी दुपारी सव्वा तीन वाजता कसबा बावड्यातील मराठा कॉलनीत एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा निरोप सीपीआरकडून मिळाला. आतापर्यंत निर्धास्त असलेली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली.
आयुक्त कलशेट्टी, सीईओ मित्तल, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक तिरूपती काकडे, शहर उपाधीक्षक प्रेरणा कट्टे, महापालिका आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे तत्काळ मराठा कॉलनीत धावले. पोलिसांच्या मदतीने संबंधित कोरोनाबाधित महिलेच्या घरातील निकटच्या पाच व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले.
मराठा कॉलनीचा पाचशे मीटर परिसर सील करण्यात आला. तीन ठिकाणी रस्त्यांवर बॅरिकेट लावून रस्ते बंद करण्यात आले. त्या परिसरातून कोणाला बाहेर पडण्यास अथवा आत जाण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला. महापालिकेची सफाई कर्मचारी, औषध फवारणीच्या सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ बोलावून घेऊन बाधित महिलेचे संपूर्ण घर तसेच आसपासची चार ते पाच घरे पूर्णत: औषधांनी धुवून काढली नंतर संपूर्ण परिसरात औषध फवारणी सुरू करण्यात आली. मराठा कॉलनीतील पाचशे मीटर परिघात राहणाऱ्या प्रत्येक घरातून नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली.