corona in kolhapur- गडहिंग्लजमध्ये रक्ततुटवड्यामुळे रुग्णांची कुचंबणा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 03:32 PM2020-04-09T15:32:39+5:302020-04-09T15:35:39+5:30
'कोरोना'चा संसर्ग आणि फैलावर रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या संचारबंदीमुळे रक्तदान शिबीरांवर मर्यादा येत आहेत.त्यामुळे येथील ब्लड बॅन्केत रक्ताचा तुटवडा भासत असून रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी कुचंबणा होत आहे.
राम मगदूम
गडहिंग्लज : 'कोरोना'चा संसर्ग आणि फैलावर रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या संचारबंदीमुळे रक्तदान शिबीरांवर मर्यादा येत आहेत.त्यामुळे येथील ब्लड बॅन्केत रक्ताचा तुटवडा भासत असून रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी कुचंबणा होत आहे.
२० वर्षापूर्वी लायन्स क्लबचे जेष्ठ कार्यकर्ते इंजिनिअर आण्णासाहेब गळतगे यांच्या पुढाकाराने गडहिंग्लजला लायन्स रक्तपेढी सुरू झाली.त्यामुळे गडहिंग्लजसह सीमा भागातील रूग्णांची मोठी सोय झाली.त्यापूर्वी कोल्हापूर,बेळगाव व निपाणी येथून रक्त आणावे लागत होते.
सध्या गडहिंग्लज शहरात उपजिल्हा रुग्णालयासह सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करणारे सुमारे शंभराहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर्स आपली सेवा देत आहेत.त्यामुळे चंदगड, आजरा,भुदरगड,गडहिंग्लज व कागलसह ,शेजारच्या कर्नाटकातील हुक्केरी,गोकाक,चिक्कोडी या तालुक्यातील अनेक रुग्ण देखील गडहिंग्लजला उपचारासाठी येतात.त्यामुळे नेहमी मोठ्या प्रमाणात रक्ताची मागणी असते.
वेळोवेळी ब्लड बँकतर्फे रक्तदान शिबीरे भरवून रक्त संकलन केले जाते आणि मागणीप्रमाणे ते रुग्णांना उपलब्ध करून दिले जाते. अलिकडेच ब्लड बँकेने रक्तदान शिबिरांसाठी वातानुकूलित वाहनदेखील घेतले आहे. परंतु, रक्तदान शिबीर आयोजनात 'कोरोना'मुळे आलेल्या मर्यादेमुळे सध्या याठिकाणी रक्ताचा तुटवडा भासत आहे.
११० तरूण आले धावून...!
आजऱ्याहून गडहिंग्लजला उपचारासाठी आलेल्या एका महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी रक्त उपलब्ध होणे अडचणीचे झाले .त्यामुळे नगरसेवक महेश कोरी यांनी केलेल्या आवाहनानुसार येथील गांधीनगर युथ सर्कलच्या कार्यकर्त्यांसह शहरातील ११० तरूणांनी उत्स्फूर्तपणे ब्लड बँकेत जाऊन रांगा लावून रक्तदान केले.त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
कोरोनाच्या संचारबंदीमुळे दळणवळण ठप्प झाले आहे.म्हणूनच रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे.त्यावर मात करण्यासाठी तरूणांनी स्वता:हून रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे.
महेश कोरी,
नगरसेवक गडहिंग्लज
'कोरोना'मुळे नेहमी प्रमाणे रक्तदान शिबीरे घेण्यात अडचणी येत आहेत.त्यामुळे इच्छुकांनी शासकीय आदेशाचा भंग न ब्लड बँकेत येऊन रक्तदान करावे.
डॉ.सभाष पाटील,
वैद्यकीय अधिकारी, लायन्स ब्लड बँक, गडहिंग्लज