corona in kolhapur-पेट्रोल, डिझेल केवळ अत्यावश्यक सेवेकऱ्यांनाच मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:46 PM2020-03-26T18:46:10+5:302020-03-26T18:48:25+5:30
कोरोना विषाणूचे गांभीर्य न ओळखता विनाकारण चमकोगिरी करीत फिरणाºयांवर वचक बसावा, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाºया वाहनधारकांनाच पेट्रोल, डिझेल देण्याचे आदेश पंपचालकांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी गुरुवारपासून शहरातील १८ व जिल्ह्यातील २९५ पंपांवर सुरू करण्यात आली.
कोल्हापूर : कोरोना विषाणूचे गांभीर्य न ओळखता विनाकारण चमकोगिरी करीत फिरणाºयांवर वचक बसावा, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाºया वाहनधारकांनाच पेट्रोल, डिझेल देण्याचे आदेश पंपचालकांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी गुरुवारपासून शहरातील १८ व जिल्ह्यातील २९५ पंपांवर सुरू करण्यात आली.
गेल्या तीन दिवसांपासून देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो नियंत्रित आणण्यासाठी सरकारी यंत्रणेसह स्वयंसेवी संस्था रात्रीचा दिवस करीत आहेत.
यात गर्दी टाळा, एकमेकांचा संपर्क टाळा, नियमित कामे बंद करा, घरातच बसा असा संदेश विविध वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रांद्वारे आणि प्रसंगी वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून नागरी वस्त्यांमध्ये पोहोचविला जात आहे. तरीसुद्धा अनेक नागरिक वैद्यकीय, औषधे, अन्नधान्य, भाजीपाला अशी कारणे सांगून दुचाकी, चारचाकी काढून फिरत आहेत.
या सर्वांवर वचक निर्माण व्हावा, जेणेकरून नागरिक घराबाहेरच पडू नयेत, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील २९५ पंपचालकांना केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनाच त्यांचे ओळखपत्र पाहूनच पेट्रोल, डिझेल देण्यास सांगितले आहे. त्यानुसार शहरातील १८ व जिल्ह्यातील २९५ पेट्रोल पंपांवर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अनेक नागरिकांना पेट्रोल पंपांवरूनच पंपातील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल मिळणार नाही; त्यामुळे रांगेत थांबू नका, अशा सूचना दिल्या. तरीसुद्धा अनेक नागरिक तेथेच घुटमळत असल्याचे चित्र शहरातील काही पेट्रोल पंपांवर होते.
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल, डिझेल पंपचालकांना केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वाहनधारकांनाच इंधन पुरवठा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पंपचालक ओळखपत्र पाहूनच पेट्रोल, डिझेल देत आहेत. नागरिकांनीही या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे.
- गजकुमार माणगावे,
अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल, डिझेल डीलर्स असोसिएशन.