Corona in kolhapur : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 09:02 PM2020-04-07T21:02:24+5:302020-04-07T21:07:19+5:30
कणेरी वाडी येथील महामार्गावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून देशी दारू व वाहन जप्त केले.
कोल्हापूर :- कणेरीवाडी येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभाग व भरारी पथकाने छापा टाकून देशी दारुचे 18 बॉक्स आणि इर्टीका वाहनासह 6 लाख 44 हजार 920 रूपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. जगदिश सुरेश बाटुंगे, (रा. कणेरीवाडी ता. करवीर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात संचारबंदी असल्याने मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध मद्य निर्मिती वाहतूक व विक्रीच्या ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात येत आहेत.
दिनांक 6 एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी कागल-कोल्हापूर ठऌ-04 हायवेवर गस्त घालत गोकुळ शिरगावच्या दिशेने जात असताना रात्री 12.15 च्या सुमारास कणेरीवाडी, ता. करवीर हद्दीत गस्तीचे शासकीय वाहन पाहून इर्टीका कार संशयास्पदरित्या अचानक वळवून हॉटेल जयहिंद समोर अंधारात जावून थांबलेली दिसली.
पथकातील अधिकाऱ्यांना वाहनाबाबत संशय निर्माण झाल्याने या ठिकाणी जावून पथकातील स्टाफने वाहनाची तपासणी केली. या कारमध्ये मागील शिट फोल्ड करुन देशी दारुचे जी.एम.डॉक्टर व टँगो पंच या ब्रँडचे 180 मिलीचे एकूण 18 बॉक्स मिळून आले. गुन्ह्यात जप्त इर्टीका कार टऌ-02 उव 5055 व देशी दारुचे बॉक्ससह 6 लाख 44 हजार 920 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान सर्वश्री संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा तपास निरीक्षक बरगे करीत आहेत.