corona in kolhapur : आजरा तालुक्यातील पॉझीटीव्ह व्यक्तींच्या संपर्कातील २८ जण क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 03:13 PM2020-05-09T15:13:11+5:302020-05-09T15:33:41+5:30
आजरा तालुक्यातील हारुर येथील मुंबईवरुन आलेले आई व मुलगा कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. सकाळी याची माहिती मिळताच प्रशासनाने या दोन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना क्वारंटाईन केले. सर्वांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी काढून घेतले असून ते कोल्हापूर येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.
सदाशिव मोरे
आजरा : आजरा तालुक्यातील हारुर येथील मुंबईवरुन आलेले आई व मुलगा कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. सकाळी याची माहिती मिळताच प्रशासनाने या दोन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना क्वारंटाईन केले. सर्वांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी काढून घेतले असून ते कोल्हापूर येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.
लॉकडाऊनमधील जनजीवन सुरळीत होत असतानाच हारुरमध्ये कोरोनाचे पॉझीटीव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सर्वच गावांमध्ये स्मशानशांतता पसरली असून भितीयुक्त वातावरण आहे.
मुंबई पोलीस दलात सेवेत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल ( बी.डी.डी.चाळ मुंबई ) यांच्या मोठ्या मुलाचे मंगळवार दि. ५ मे रोजी निधन झाले. त्याचा मृतदेह घेवून मुंबईतून चौघेजण हारुर येथे बुधवार दि. ६ मे रोजी आले. ग्रामस्थांनी मृतदेह गावात घेण्यास विरोध केल्याने गावाबाहेरील स्मशानभूमीत भाऊबंद व नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करणेत आले.
अॅब्युलन्समधील तिघांचे गुरुवारी गडहिंग्लज येथे स्वॅब घेणेत आले. त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असलेली आई व मुलगा पॉझिटिव्ह तर सोबत असणारी भावजयीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. आई व मुलाला सी.पी.आर.हॉस्पीटल कोल्हापूर येथे तर भावजयीवर आजऱ्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.
हारुरमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याने सकाळपासूनच तहसिलदार विकास अहिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे यांनी गावातच तळ ठोकून माहिती घेण्यास सुरुवात केली. आरोग्य सेवक, आशा व अंगणवाडी सेविकांच्यामार्फत सर्व्हे करण्यात आला.
पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या भाऊबंद व नातेवाईक यांची माहिती दुपारी दोनपर्यंत गोळा केली. त्यानंतर आजरा येथील केव्हीड सेंटरमध्ये डॉ.अशोक फर्नांडीस व डॉ. राऊत यांनी तपासणी करुन त्यांच्या घशातील स्वॅब काढण्यात आले.
हारुरमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज प्रशासनाने हारुर गावाच्या सात कि. मी. चार परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषीत केला. सात कि. मी.च्या १४ गावातील सर्व गावांचे प्रवेशद्वार बंद करुन लॉकडाऊन केले आहे.त्यापाठोपाठ आजरा तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवून सर्व गावांच्या सीमा बंद करणेत आल्या आहेत. हारुरच्या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र भितीयुक्त वातावरण पसरले आहे.