corona in kolhapur : सांगरूळचा अकरा फुटांचा पैलवान कोरोना विरुद्धच्या आखाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 04:52 PM2020-05-14T16:52:32+5:302020-05-14T16:56:29+5:30
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. सांगरूळ (ता. करवीर) येथील चंद्रकांत जंगम यांनी अकरा फुटी पैलवान तयार करून त्याच्या माध्यमातून ते कोरोनाविरुद्धच्या आखाड्यात उतरले आहेत. गल्लोगल्ली जाऊन त्यांनी प्रबोधन सुरू केल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.
कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. सांगरूळ (ता. करवीर) येथील चंद्रकांत जंगम यांनी अकरा फुटी पैलवान तयार करून त्याच्या माध्यमातून ते कोरोनाविरुद्धच्या आखाड्यात उतरले आहेत. गल्लोगल्ली जाऊन त्यांनी प्रबोधन सुरू केल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.
कोरोनाच्या लढाईत सांगरूळचा लॉकडाऊन पॅटर्न सर्वत्र चर्चेत राहिला. सध्या गावात दक्षता समिती जरी काम करीत असली तरी चंद्रकांत जंगम यांनी वेगळ्या प्रकारे लोकांचे प्रबोधन सुरू केले आहे. जंगम हे गणेशोत्सवाच्या काळात विविध प्रकारच्या कलाकृती करून त्यातून समाजप्रबोधनाचे काम करतात. त्यांचे हे काम अविरतपणे सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अकरा फुट उंचीच्या फेटेवाल्या पैलवानाची प्रतिकृती तयार केली. पैलवानाच्या गळ्यात घरी रहा - सुरक्षित रहा, आता आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार, लक्षात ठेवा, सूट शासनाने दिली, कोरोनाने नव्हे अशा घोषणा अडकवल्या आहेत. जंगम स्वत: हा पैलवान हाताळतात. त्या प्रतिकृतीमध्ये उभे राहून ते गल्लोगल्ली जाऊन ग्रामस्थांचे प्रबोधन करीत आहेत.
सांगरूळचे ज्येष्ठ शिल्पकार स्वर्गीय गणपतराव जाधव यांच्याकडून प्रेरणा घेऊन चित्रकला व शिल्पकला आत्मसात केली. हे ज्ञान आत्मसात करत असताना जाधव गुरुजींकडील सेवाभावी वृत्तीसुद्धा अवगत केली. सध्या कोरोनाच्या संकटाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत लोकांना प्रबोधनाची गरज आहे, म्हणूनच हा प्रयत्न केला.
- चंद्रकांत जंगम (सांगरूळ)