corona in kolhapur : शिरोळ तालुक्यातील ड्रायव्हर कोरोनाचा संशयित, ११ दिवसानंतर दिसली लक्षणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 01:01 PM2020-04-02T13:01:33+5:302020-04-02T13:03:45+5:30
शिरोळ तालुक्यातील एका ड्रायव्हरला कोरोनाची बाधा झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील एका ड्रायव्हरला कोरोनाची बाधा झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले आहे.
इचलकरंजी येथील एका व्यापारी कुटूंबातील मुलगा आॅस्ट्रेलियात रहात होता. २२ मार्च रोजी तो विमानाने मुंबईला आला. त्याला आणण्यासाठी म्हणून शिरोळ तालुक्यातील एका गावातील २९ वर्षांचा एका चालकाने या कुटूंबियांची गाडी घेउन मुंबईला गेला. २३ मार्च रोजी तो त्याला घेउन परत आला. त्यावेळी तया युवकाच्या हातावर होम कॉरोन्टाईनचा शिक्का मारला. त्या दिवशी हा तरुण ड्रायव्हर त्या कुटूंबियांच्या घरी राहिला.
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून या तरुणाला सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे अशाप्रकारचा त्रास सुरु झाला. बुधवारी सायंकाळी मात्र, त्याचा त्रास वाढल्यामुळे त्याला बुधवारी सायंकाळी सीपीआरमधील विशेष कोरोना कक्षात दाखल करण्यात आले. त्याच्या घशाचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
तब्बल अकरा दिवसांनंतर दिसली लक्षणे
२२ मार्च रोजी आॅस्ट्रेलियातून परतलेल्या युवकाच्या संपर्कात आलेल्या या ड्रायव्हरला तब्बल अकरा दिवसांनी म्हणजेच १ एप्रिल रोजी कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे काळजी न घेता वावरल्याचा फटका या ड्रायव्हरला बसलेला आहे. त्यामुळे इतक्या दिवसांनंतरही या आजाराशी संबंधित लक्षणे दिसू शकतात, याबद्दल काळजी घेण्याची गरज आहे.
बाहेरुन आलेल्यांनी तपासणी करुन घ्यावी
अजूनही अनेक लोक बाहेरुन कोल्हापूरात आले असतील तर त्यांनी स्वत:ची तपासणी करुन घ्यावी आणि होम कॉरन्टाईन पाळावे. अन्यथा आठवडभरात काही झाले नाही, या समजूतीत राहू नये. कोरोनाशी संंबंधित लक्षणे दिसत असतील तर वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी आणि कोरोनाचा फैलाव होउ नये, याची काळजी घ्यावी.
चंदगड तालुक्यातील २५ जण इन्स्टिट्यून्शन कॉरन्टाईन
चंदगड तालुक्यातील मजले शिरगाव येथील ६५ वर्षांच्या मुंबईहून आलेल्या व्यक्तीचा मंगळवारी अचानक मृत्यू झाला. त्याच्या घशाचे स्त्रावही घेण्यात आले नव्हते. पण त्याच्या संपर्कात आलेल्या २५ जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले असून त्यांना मंगळवारीच गडहिंग्लज येथे इन्स्टिट्यून्शल कॉरोन्टाईन करण्यात आले आहे.
कोल्हापूरातील २0 जणांच्या घशाचे स्त्राव तपासणीसाठी रवाना
कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २0 जणांच्या घशांचे स्त्राव बुधवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आज सायंकाळी उशिरा अपेक्षित आहे.
मिरजेतील तपासणी प्रयोगशाळेचे काम लवकरच
मिरज येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे काम आज किंवा उद्या सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे पुण्यातील प्रयोगशाळेत केले जाणाऱ्या तपासणीचे काम लवकर सुरु होउन अहवाल तत्काळ मिळण्यास सुरुवात होतील.