corona in kolhapur -‘ते’ बंदोबस्तात रस्त्यावर, तर ‘त्या’ रुग्णसेवेत : कोरोनाविरोधात दोघांचाही लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:44 AM2020-04-13T11:44:42+5:302020-04-13T11:46:43+5:30
जनसेवा हेच त्यांचे आद्य कर्तव्य, तोच ध्यास, देशसेवेची त्यांनी शपथ घेतली अन् स्वत:च्या जिवाची पर्वा न करता हे दाम्पत्य आज ‘कोरोना’पासून जनतेच्या रक्षणार्थ आपापल्या क्षेत्रात लढा देत आहे. एक पोलीस प्रशासनात, तर एक रुग्णसेवेत आपली पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. हे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व त्यांच्या पत्नी डॉ. सोनाली देशमुख होय. जिल्ह्याला अभिमान वाटावे असे त्यांचे कर्तृत्व जनतेसमोर आले आहे.
कोल्हापूर : जनसेवा हेच त्यांचे आद्य कर्तव्य, तोच ध्यास, देशसेवेची त्यांनी शपथ घेतली अन् स्वत:च्या जिवाची पर्वा न करता हे दाम्पत्य आज ‘कोरोना’पासून जनतेच्या रक्षणार्थ आपापल्या क्षेत्रात लढा देत आहे. एक पोलीस प्रशासनात, तर एक रुग्णसेवेत आपली पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. हे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व त्यांच्या पत्नी डॉ. सोनाली देशमुख होय. जिल्ह्याला अभिमान वाटावे असे त्यांचे कर्तृत्व जनतेसमोर आले आहे.
हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाची कोल्हापूर जिल्ह्यातही काही प्रमाणात लागण झाली; पण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रशासकीय यंत्रणा जलद गतीने हाताळून पोलिसांच्या साथीने कोरोनाला जिल्ह्याच्या सीमेवरच रोखले. दुसऱ्या बाजूने त्यांच्या पत्नी डॉ. सोनाली देशमुख ह्या ‘सीपीआर’च्या कोरोना कक्षात जिवाची बाजी लावत रुग्णसेवेत आहेत.
डॉ. अभिनव देशमुख यांनी कोल्हापूर जिल्हा अधीक्षक पदाची सूत्रे घेतल्यानंतर पोलिसांना विश्वासात घेऊन काम केले. दोन नंबरवाल्यांची पाळेमुळे खणून काढली. गडचिरोलीमध्येही त्यांनी नक्षलवाद्यांची चळवळ मोडीत काढली; तर त्यांच्या पत्नी डॉ. सोनाली यांची आरोग्यसेवेतील कामगिरी विशेष कौतुकास्पद आहे.
कोल्हापुरात डॉ. अभिनव देशमुख हे जिल्ह्याला ‘कोरोना’ची लागण होऊ नये म्हणून पोलिसांसह अहोरात्र रस्त्यावरच आहेत; तर दुसरीकडे डॉ. सोनाली देशमुख ह्या सहकारी डॉक्टरांसमवेत ‘सीपीआर’मध्ये कोरोनाविरोधात लढा देत रुग्णसेवा बजावत आहेत.
पोलीस आणि आरोग्य ही दोन्हीही क्षेत्रे वेगवेगळी; पण ध्येय एकच. त्यासाठी हे दाम्पत्य आपापल्या क्षेत्रात कोरोनाच्या मृत्युछायेत सेवा बजावत आहे. इतरांप्रमाणे देशमुख दाम्पत्यालाही इरा आणि कणाद अशी दोन चिमुकली आहेतच; पण स्वखुषीने सेवा बजावणाºया देशमुख दाम्पत्याची सेवा, कर्तव्य हे आदर्शवतच आहे.
कोल्हापूरकरांनाही आवाहन
डॉ. देशमुख दाम्पत्य हे जिवाची बाजी लावून सेवा बजावत असताना कोल्हापूरकरांनी कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत घरातच थांबावे, सोशल डिस्टन्सिंगचे सौजन्य पाळावे.
डॉ. सोनाली मूळच्या सांगलीच्या
डॉ. सोनाली देशमुख यांचे शिक्षण आणि बालपण मुंबईत गेले असले तरीही त्यांचे मूळ गाव सांगली आहे. त्या एम.बी.बी.एस., डी.एन.बी. आहेत. कोल्हापुरात ‘सीपीआर’मध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून त्या सेवा बजावतात. कोरोना कक्षात त्याही रुग्णसेवेत आहेत. डॉ. अभिनव देशमुख सकाळी दहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत कामात व्यस्त असतात.