corona in kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनाचे दोन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 04:45 PM2020-04-20T16:45:57+5:302020-04-20T16:48:24+5:30
मुंबईहून कर्नाटककडे निघालेल्या कंटेनरमधील किणी टोलनाक्यावर ताब्यात घेतलेल्या २९ पैकी आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.
कोल्हापूर : मुंबईहून कर्नाटककडे निघालेल्या कंटेनरमधील किणी टोलनाक्यावर ताब्यात घेतलेल्या २९ पैकी आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.
रविवारी याच कंटेनगरमधील पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच कंटेनरमधील आणखी एका ४२ वर्षीय महिलेची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे शिवाय इचलकरंजीमध्ये ६० वर्षीय व्यक्तीलाही लागण झाल्याचा अहवाल आला आहे. जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी दोन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १० वर पोहोचली आहे.
मुंबईतील सांताक्रुझ भागातून कंटेनरमधून २७ जण लपून कर्नाटकातील हसन जिल्ह्याकडे जात होते. राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (दि. १७) हा कंटेनर किणी टोलनाक्यावर पोलिसांनी अडविला. त्यावेळी त्या कंटेनरमधील चालक, वाहकांसह एकूण २९ जणांना ‘सीपीआर’च्या कोरोना कक्षात आणून त्यांना क्वारंटाईन केले होते.
त्यापैकी ५० वर्षीय व्यक्तीस रविवारी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्या रुग्णास तातडीने वेगळे केले. त्यानंतर याच कंटेनरमधून प्रवास करणाऱ्या आणखी एका ४२ वर्षीय महिलेचा चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत चार टप्प्यांत मिरज येथून आलेल्या ४३ चाचणी अहवालांपैकी ४२ निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कंटेनरमधील एकूण २९ जणांच्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना तातडीने वेगळे करण्यात आले आहे तर इतरांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, इचलकरंजी शहरातही कोरोना विषाणूंनी एन्ट्री केली आहे. सोमवारी दुपारी आयजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६० वर्षीय वृद्धास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. हा रुग्ण इचलकरंजीतील कोले मळा परिसरातील आहे.
चार दिवसांपूर्वी विजापूरहून इचलकरंजी येथे अंत्यविधीसाठी आलेल्या एकास दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे विजापूरमध्ये चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या इचलकरंजीतील व्यक्ती संपर्कात आली होती.
त्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल केले होते, त्यांच्या घशातील स्राव शुक्रवारी घेतले होते. त्याचा पॉझिटिव्ह चाचणी अहवाल सोमवारी प्राप्त झाला. त्यामुळे याही रुग्णाला तातडीने वेगळे करण्यात आले आहे.