कोरोनाने १२६ मुलांच्या नशिबी पोरकेपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:59+5:302021-05-27T04:24:59+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या विषवल्लीने जिल्ह्यातील १२६ मुलांच्या डोक्यावरून माता-पित्याचे मायेचे छत्र हिरावून घेतले आहे. यापैकी कांही बालकांच्या ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या विषवल्लीने जिल्ह्यातील १२६ मुलांच्या डोक्यावरून माता-पित्याचे मायेचे छत्र हिरावून घेतले आहे. यापैकी कांही बालकांच्या वडिलांचे तर काहींच्या आईचे निधन झाले आहे. तर दोन बालके आई-वडील दोघांनाही पोरकी झाली आहेत. या बालकांचे बालपण जपण्याचे आव्हान असून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यासारख्या सामाजिक दातृत्वाची गरज आहे.
कोरोना महामारीमुळे अनेक कुटुबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. एकाच घरातील दोन ते पाच व्यक्तींचे निधन झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ४५ वर्षाच्या आतील व्यक्तींनाही मोठ्या प्रमाणात बाधा झाली असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील अधिक आहे. त्यामुळे आई-वडील आणि मुले-मुली असा सुखी संसार असलेल्या या कुटुंबातील लहानग्यांवर अनाथपणाचा डोंगर कोसळला आहे. त्यातही वडिलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. पती किंवा पत्नीच्या निधनानंतर संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडलेल्या जोडीदारावर आता मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आली आहे.
पदरात दोन-तीन लहान मुले, आर्थिक ताणतणाव, जवळच्या व्यक्तीच्या निधनाचे दु:ख आणि आपल्या लहानग्यांना आलेल्या अनाथपणाच्या वेदना उराशी बाळगून ही कुटुंबे आता सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनानेे एका पालकाचे निधन झालेल्या बालकांची संख्या सध्या जिल्ह्यात १२६ इतकी आहे. याशिवाय रोज माहिती मिळेल त्याप्रमाणे मुलांची नोंद केली जात आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी अशा मुलांची एकत्रित नोंद करा, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल, त्यांचे शिक्षण थांबणार नाही आणि वेळ आलीच तर त्यांची दत्तक प्रक्रियादेखील केली जाईल, असे जाहीर केले आहे.
---
१०९८ वर फोन करा
कोरोनामुळे पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या मुलांसाठी जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे. ज्या मुलांचे संगोपन करायला कोणी नाही अशा बालकांच्या पुनर्वसनासाठी त्यांना संस्थेत दाखल करून दत्तक प्रक्रिया केली जाणार आहे. एखाद्या रुग्णालयात किंवा नातेवाईकांपैकी असे कुणाचे निधन झाले असेल आणि त्यांना लहान मुले असतील तर संबंधितांनी १०९८ वर फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मुलांचे संगोपन करायला जवळचे नातेवाईक तयार असतील तरी या मुलांची माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे.
सुजाता शिंदे (महिला व बालकल्याण अधिकारी)
---
अन्य संस्थांना अधिकार नाही...
अनाथ झालेल्या बालकांना सांभाळण्यासाठी संस्था, संघटना पुढे आल्या असल्या तरी नोंदणी असल्याशिवाय त्यांना बालकांना सांभाळता येणार नाही. कोवळ्या जीवांचा गैरकृत्यासाठी वापर केला जाऊ नये, अवैध मानवी तस्करीत ते ओढले जाऊ नयेत यासाठी यंत्रणा काम करत आहे. त्यामुळे संस्था कितीही चांगली असली तरी त्यांनी शासनाकडे रीतसर आपल्या संस्थेची नोंदणी केल्यानंतरच मुले सांभाळण्याचा त्यांना अधिकार मिळू शकतो.
--
२ महिन्यापासून १८ वर्षांपर्यंतची मुले
या १२६ अनाथ बालकांमध्ये अगदी दोन-तीन महिन्यांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींचा समावेश आहे. शाहूवाडी, चंदगड, गगनबावडासारख्या दुर्गम भागात तर एका पालकाचे कोरोनाने निधन झाले आणि पदरात चार-चार मुले आहेत अशादेखील महिला आहेत. त्यांच्यासमोर मुलांचे संगोपन कसे करायचे, हा मोठा प्रश्न आहे.
--