corona virus : कोरोनाच उद्रेक सुरूच, चोवीस तासांत १३ जणांचा मृत्यू : ३५१ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:11 AM2020-07-27T11:11:57+5:302020-07-27T11:13:48+5:30
रोज दोनशे, अडीचशे, तीनशे इतक्या चढत्या क्रमाने रुग्णसंख्या वाढत चालली असून, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तब्बल ३५१ नवे रुग्ण आढळून आले; तर १३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यात आरोग्य व जिल्हा प्रशासनाला अपयश येत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. रोज दोनशे, अडीचशे, तीनशे इतक्या चढत्या क्रमाने रुग्णसंख्या वाढत चालली असून, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तब्बल ३५१ नवे रुग्ण आढळून आले; तर १३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुरती हादरून गेली आहे. त्यातूनच उपचारातील सावळागोंधळाचे प्रकारही उजेडात येत आहेत.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून कोल्हापूर, इचलकरंजी शहर तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाला आळा घालण्याचे एक मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे.
कोल्हापूर शहरवासीयांच्या छातीत धडकी भरेल अशी रुग्णसंख्या समोर आली आहे. दिवसभरात एकट्या कोल्हापूर शहरात १९५ रुग्ण आढळून आले. यादवनगरात एकाच ठिकाणी २५ रुग्ण सापडले. या ठिकाणी समूह संसर्ग झाल्यासारखी परिस्थिती आहे. विक्रमनगर, टेंबलाईवाडी, टिंबर मार्केट, दौलतनगर, साने गुरुजी वसाहत, संभाजीनगर यांसह शहराच्या अनेक भागांत रुग्ण आढळून आले. त्यामुळे संपूर्ण शहरात कंटेन्मेंट झोन करावे लागले आहे.
दिवसभरात १२ चाचणी अहवाल बाहेर आले. शनिवारचा दिवस राधानगरी तालुक्यासाठीही धक्कादायक ठरला. तालुक्यात ४० हून अधिक रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. शिरगाव येथील २० रुग्ण आढळून आले; तर सरवडे, शेळेवाडी, मोहाडे, लाडवाडी, सोन्याची शिरोली, राशिवडे येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर आले.
हातकणंगले तालुक्यात नवीन ३० रुग्ण आढळले. कोरोनाने धुमाकूळ घातलेल्या इचलकरंजी शहरात शनिवारी दिवसभरात २८ रुग्ण नवीन आढळले. तर मागच्या चार दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ९१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या २४ तासांत म्हणजे शुक्रवार रात्री ते शनिवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेणाऱ्या १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. केवळ कोरोनामुळेच नाही तर काही जुने आजारही या मृत झालेल्या व्यक्तींमध्ये असल्याचे सांगण्यात येते.
मृत झालेल्यांमध्ये इचलकरंजी शहरातील लाखे मळा, जुना चंदूर रोड येथील तिघांचा समावेश आहे. याशिवाय चंदगड तालुक्यातील एक पुरुष, करवीर तालुक्यातील एक पुरुष, हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथक्षल एक महिला, सावर्डे येथील पुरुष, गडहिंग्लज तालुक्यातील एक पुरुष, तर पन्हाळा तालुक्यातील भैरेवाडी येथील एका वृद्धाचा मिळून नऊ मृत्यू झाले होते. रात्री पुन्हा चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे २४ तासांत एकूण १३ रुग्ण मृत्युमुखी पडले.
मृतांचा आकडा १०७ वर
जिल्ह्यात कोरोनासह अन्य विकारांनी आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा शनिवारी रात्री १०७ वर जाऊन पोहोचला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू इचलकरंजी शहरात ३९ झाले. त्याखालोखाल कोल्हापूर शहर १८, करवीर तालुक्यात १०, हातकणंगले तालुक्यात ११, तर गांधीनगर येथे सहाजणांचे मृत्यू झाले आहेत. ही बाब चिंता वाढविणारी आहे.
कोरोना रुग्ण / नातेवाइकांसाठी मोबाईल नंबर
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेडची माहिती देण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात एक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी ९३५६७१६५६३ / ९३५६७३२७२८ / ९३५६७१३३३० असे तीन मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.
राज्य सरकारकडून मदतीची आवश्यकता
कोल्हापुरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून येथील परिस्थिती आरोग्य यंत्रणेच्या आवाक्याबाहेर जात आहे. रोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्यामुळे त्यांच्यावर उपचाार करणारे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. इमारती अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे डॉक्टर्स, नर्स याची संख्या वाढली पाहिजे. त्याकरिता राज्य सरकारकडून मदत मिळायला पाहिजे. तरच कोरोना रुग्णांवर उपचार करणे सोयीचे जाईल; अन्यथा परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.