कोरोना रुग्णाच्या नातेवाईकाला अज्ञात भामट्याकडून ९ हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:09+5:302021-05-27T04:27:09+5:30
गडहिंग्लज : शासनाकडून उपचाराचा खर्च मिळवून देण्याच्या बहाण्याने येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाला अज्ञात ...
गडहिंग्लज :
शासनाकडून उपचाराचा खर्च मिळवून देण्याच्या बहाण्याने येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाला अज्ञात भामट्याने तब्बल ९ हजारांचा गंडा घातला. या प्रकाराबद्दल गडहिंग्लजसह सीमाभागात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दुसऱ्या लाटेत गडहिंग्लज तालुक्यासह सीमाभागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह सीमाभागातील अनेक बाधित रुग्ण गडहिंग्लज शहरातील शासकीय आणि खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
खासगी दवाखान्यातील उपचाराचा खर्च गोर-गरिबांच्या आवाक्याबाहेरील असल्यामुळे अनेकजण राहते घर-शेतजमीन गहाणवट ठेवून किंवा उधार उसनवार करून उपचार घेत आहेत. त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पैसे उकळण्याचा फंडा काही भामट्यांनी शोधून काढल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.
मंगळवारी (२५) दुपारी एका अज्ञात व्यक्तीने येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकाला गाठले. आपण अनेक रुग्णांच्या उपचाराचे पैसे शासनाकडून मिळवून दिले आहेत. त्याप्रमाणे आपल्या रुग्णाच्या उपचाराचे पैसेदेखील आपण मिळवून देऊ, अशी बतावणी केली. त्याच्या बोलण्यावर रुग्णाच्या नातेवाईकांचा विश्वास बसला.
या कामासाठी शासनाकडे पाठविण्याकरिता म्हणून रुग्णाची कागदपत्रे मागून घेतली. त्यानंतर नगरपालिकेत ९ हजार रुपये भरावे लागतील, असेही त्याने सांगितले. आशेपोटी त्या रुग्णाच्या नातेवाईकाने पैसे देण्याची तयारी दर्शवली.
दरम्यान, दवाखान्यात जाऊन त्याने 'त्या' रुग्णाच्या नातेवाईकाकडून कागदपत्रे व पैसे घेतले. त्याला सोबत घेऊन तो नगरपालिकेसमोर आला. मी नगरपालिकेत पैसे भरून येतो, तुम्ही इथेच थांबा असे सांगून त्याला पालिकेच्या बाहेर थांबवून तो आत गेला, परंतु बराचवेळ झाला तरी 'तो' परत न आल्यामुळे आपली फसगत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीची शोधाशोध केली. पैसे घेऊन पलायन केल्यामुळे त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे हताश होऊन ते रुग्णालयाकडे परतले, परंतु यासंदर्भात पोलिसात कोणतीही नोंद नाही.
-------------------------
* 'मास्क'मुळे संरक्षण आणि फसगतही..!
अज्ञात भामट्याने तोंडावर मास्क बांधला होता. त्यामुळे त्या रुग्णाच्या नातेवाईकाला त्याची ओळख होऊ शकली नाही. केवळ त्याच्या बोलण्याला भुलूनच त्यांनी त्याच्याकडे पैसे व कागदपत्रे दिली. कोरोना काळातील 'मास्क' बांधण्याच्या नियमाचा गैरफायदा घेत त्या भामट्याने स्वत:चे संरक्षण करून घेऊन ९ हजारावर डल्ला मारला.
आमिषाला बळी पडू नये
कोरोना रुग्णावरील उपचाराचा खर्च शासनाकडून मिळवून देतो, असे सांगून पैशाची मागणी कुणी करत असेल तर रुग्णांच्या नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा प्रकारच्या आमिषाला कोणीही बळी पडू नये.
- प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक, गडहिंग्लज.