जिल्ह्यात जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण: जिल्हाधिकारी दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 03:54 PM2020-12-11T15:54:36+5:302020-12-11T15:56:43+5:30
CoronaVirusUnlock, Collcator, kolhapurnews आरोग्यसेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांनी तालुका आरोग्याधिकारी, शहर आरोग्याधिकारी, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
कोल्हापूर : राज्य शासनामार्फत जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आरोग्यसेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांनी तालुका आरोग्याधिकारी, शहर आरोग्याधिकारी, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
कोरोना लसीकरणाच्या अंमलबजावणीच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा कृती दल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, नोडल अधिकारी डॉ. फारूख देसाई उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, लसीकरणासाठी सर्व शासकीय डॉक्टर्स, आरोग्यसेवक यांची नोंदणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. परंतु, खासगी डॉक्टर्स आणि खासगी आरोग्य यंत्रणेशी निगडित काम करणारे जे सेवक आहेत, संस्था आहेत, यांची नोंदणी अद्यापही अपूर्ण आहे.
जे वैद्यकीय क्षेत्रात काम करीत आहेत आणि ज्यांनी वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केली आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांनी आपली नोंदणी तालुका आरोग्याधिकारी, शहर वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त कार्यालयात करावी. यामुळे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या मोहिमेत सुलभतेने लसीकरण करता येईल.
डॉ. साळे म्हणाले, लसीकरणासाठीच्या पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक, कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि नगरपालिका, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा तर तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा व्यक्तींचा समावेश आहे.
बैठकीला राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये, नगरपालिका प्रशासन एम. एस. निगवेकर, एस. एस. घोरपडे, आदी उपस्थित होते.
५ लाख ५७ हजार लाभार्थी
नोडल अधिकारी देसाई यांनी लाभार्थ्यांची नोंदणी, लसीकरण पथकाचे प्रशिक्षण, लसीसाठी शीतसाखळी केंद्रे याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, पहिल्या टप्प्यासाठी पाच लाख ५७ हजार १७६ लाभार्थी आहेत; तर जिल्ह्यात एकूण १२२ शीतसाखळी केंद्रे आहेत.