शहापुरात फिरस्त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:07+5:302021-05-20T04:26:07+5:30
इचलकरंजी : शहापूर (ता. हातकणंगले) येथील दत्तनगर परिसरातील एका फिरस्त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्यावर उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फेऱ्या ...
इचलकरंजी : शहापूर (ता. हातकणंगले) येथील दत्तनगर परिसरातील एका फिरस्त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्यावर उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागल्याने व त्याला मिळालेल्या वागणुकीबाबत सामाजिक कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त होत आहे.
दत्तनगर परिसरात १५ वर्षांहून अधिक काळ एक फिरस्ता मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होता. त्याची तब्बेत बिघडल्याची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्यास मिळाली. त्यांनी तातडीने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हातकणंगले प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथे अँटिजन तपासणी केल्याशिवाय उपचारासाठी दाखल करता येत नसल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला पुन्हा आयजीएम रुग्णालयात नेले.
दरम्यान, तेथे तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला व्यंकटेश्वरा कोविड केंद्रामध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी पाहिले असता त्याच्या पायाला जखम होती. त्यामुळे त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. याबाबत त्या कार्यकर्त्याने जाब विचारत संताप व्यक्त केला. अखेर आयजीएम प्रशासनाने फिरस्त्यावर उपचार सुरू केले.