प्रशासनाच्या जीवावर खासदारांची कोरोना सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:21 AM2021-05-22T04:21:51+5:302021-05-22T04:21:51+5:30
(संजय मंडलिक, धैर्यशील माने व संभाजीराजे यांचे फोटो वापरावेत) नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या ...
(संजय मंडलिक, धैर्यशील माने व संभाजीराजे यांचे फोटो वापरावेत)
नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. बाधित रुग्णांसह मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढून देशात आघाडीवर येण्याचा बदलौकिकही मिळवला आहे. अशा परिस्थितीत लोकांची धावाधाव सुरु असताना, जिल्ह्याचे दोन विद्यमान व दोन माजी खासदार नेमके करतात तरी काय, याची चाचपणी केली असता, सुदैवाने सर्व खासदार कोविड सेंटरच्या कामात व्यस्त असल्याचे आढळले. पण प्रत्यक्षात त्यांच्या मदतीचा लोकांना प्रत्यक्ष काही लाभ मिळत असल्याचे दिसले नाही. प्रशासनाच्या जीवावरच खासदारांची जनसेवा सुरु असून, अजूनही फारसा स्वत:च्या खिशात हात घातलेला दिसत नाही.
जिल्ह्यात संजय मंडलिक, धैर्यशील माने हे दोन शिवसेनेचे खासदार आहेत. संभाजीराजे हे राष्ट्रपतीनियुक्त खासदार आहेत. राजू शेट्टी व धनंजय महाडिक हे माजी खासदार आहेत. हे सर्वजण सध्या कोविड सेवेत व्यस्त दिसत आहेत, लोकांच्या हाकेला धावून जात आहेत, प्रशासकीय यंत्रणेला हलवत आहेत, गागोगावचे दौरे करत आहेत. पण हे सगळे शासकीय निधी आणि शासकीय यंत्रणेच्या आधारेच सुरु आहे. संजय मंडलिक आणि राजू शेट्टी हे याला थोडाफार अपवाद आहेत. शेट्टी यांनी लोकवर्गणीतून हातकणंगले मतदारसंघात दोन कोविड केअर सेंटर सुरु केली आहेत, पण ती अजून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाहीत. मंडलिक हे देखील तालुक्यात मोक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करत आहेत. सायबर, आजरा, गडहिंग्लज येथे उद्घाटन झाले आहे, त्यातीलही सायबर वगळता अजून कार्यान्वित झालेली नाहीत. त्यांनी ‘खासदार किचन’ नावाने ग्रामीण भागातील गोरगरिबांसाठी अन्नाची पाकिटे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, यातून रोज दीड हजार जणांना मोफत जेवण द्यायचे आहे, तेही अजून पूर्ण क्षमतेने सुरु झालेले नाही. रोज किती भुकेलेल्यांना अन्नाची पाकिटे दिली जातात, याबद्दलची अधिकृत माहिती त्यांच्याकडून मिळत नाही. धैर्यशील माने हे प्रशासकीय यंत्रणेचा वापर करुन कोविड सेवा करत आहेत. ते स्वत:च कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या जनसेवेला मर्यादा आल्या. इचलकरंजीत ५० बेडचे कोविड सेंटरशिवाय वारणा कोडोली, शिरोळ, इचलकरंजी येथे ऑक्सिजन प्रकल्प प्रस्तावित आहे. परंतु, प्रत्यक्षात ते कधी सुुरु होतात, याची प्रतीक्षाच आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी हाॅकी स्टेडिअम येथे १५० बेडचे केअर सेंटर सुरु करण्याची घोषणा केली आहे, पण तीही अजून प्रत्यक्षात आलेली नाही.
संभाजीराजे आरक्षण लढाईत...
खासदार संभाजीराजे हे मराठा आरक्षणाच्या लढाईत राज्यभर दौरे करत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने ते पाठपुरावा करत आहेत. त्याशिवाय रायगड विकास प्राधिकरणाच्या कामातही ते व्यस्त आहेत. त्यामुळे कोविड काळात रुग्णांच्या मदतीकडे त्यांना फारसे लक्ष देता आलेले नाही.
संजय मंडलिक
तीन कोटींचा निधी कोविडसाठी
ग्रामीण आरोग्य केंद्र बळकटीकरणावर भर
खासदार किचन अंतर्गत मोफत अन्न
रोज तालुकानिहाय दौरे
धैर्यशील माने
एक कोटीचा खासदार निधी कोरोनासाठी
मतदार संघातील रोज १५ गावांना भेटी
औषधोपचारांसाठी हेल्पलाईन