जुलैअखेर कोल्हापुरातील कोरोना स्थिती नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:55+5:302021-07-17T04:19:55+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यूदर कमी झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात येण्याच्या ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यूदर कमी झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात येण्याच्या स्थितीत आहे. जुलैअखेरीस जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असेल, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. लसीकरणामध्येही जिल्हा अव्वल ठरल्याबद्दलही त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.
टोपे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आताच व्हीसीव्दारे संपर्क झाला. त्यांनी ट्रॅकिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट आणि टीकाकरण म्हणजे लसीकरण असे चार महत्त्वाचे घटक सांगितले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी १४ जूनला जी बैठक घेतली होती, त्यानंतर स्थितीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात जरी रूग्णसंख्या वाढत असली तरीही परिस्थिती जुलैअखेर नियंत्रणात येऊ शकते. एक हजार डॉक्टरांची भरती करण्यात आली आहे. दोन महिन्यात आणखी एक हजार डॉक्टर्सच्या जागा भरणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी पावसाळी अधिवशेनामध्ये २०५ कोटी रूपयांचा निधी राज्य आपत्कालिन निधीतून मंजूर केला आहे. १५ वर्षांपूर्वीच्या एक हजार रूग्णवाहिका वापरातून काढण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ५०० नवीन रूग्णवाहिका देण्यात आल्या असून, उर्वरित ५०० रूग्णवाहिकांसाठी ७८ कोटी रूपये मंजूर केले आहेत. तिसऱ्या लाटेआधी सुविधा तयार करण्यासाठी अधिवेशनामध्ये १,२२२ कोटी रूपयांची मंजुरी दिली आहे.
१४ जूनची स्थिती १६ जुलैची स्थिती
दैनंदिन चाचण्या : २६ हजार ६८ हजार
पॉझिटिव्हिटी रेट : १५.६ ९.६० टक्के
मृत्यूदर : ३.४ १.३ टक्क्यांवर
गृह अलगीकरणाचे प्रमाण : ४८ टक्के २८ टक्क्यांवर
चौकट
पुण्याला स्वॅब तपासण्यास परवानगी
कोल्हापूरमध्ये चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील कंपनीकडे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येतात. तरीही अहवाल येण्यास उशिर होत असल्याने पुण्यातील दोन संस्थांमधून स्वॅब तपासून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याला खास परवानगी देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.
चौकट
तिसरी लाट विचारात घेऊन
कोरोनाची तिसरी लाट डोळ्यासमोर असताना कोरोना रूग्णांच्या ज्या-ज्या म्हणून आरोग्य चाचण्या आवश्यक आहेत, त्या-त्या करण्याविषयी सूचना देण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले.
चौकट
उद्योजकांचा कोल्हापूर पॅटर्न
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी स्वखर्चाने लस विकत घेऊन आपल्या कामगारांना दिली. कोल्हापूरचा हा पॅटर्न महाराष्ट्राने राबविण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.