कोरोना परिस्थिती हाताबाहेर; चोवीस तासांत ३१ मृतांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:26 AM2021-04-20T04:26:48+5:302021-04-20T04:26:48+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी पहिल्या लाटेत ज्या गतीने कोरोनाचे रुग्ण वाढले, त्याच्या पेक्षा अधिक गतीने दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत आहेत. ...

Corona situation out of hand; Funeral on 31 dead in 24 hours | कोरोना परिस्थिती हाताबाहेर; चोवीस तासांत ३१ मृतांवर अंत्यसंस्कार

कोरोना परिस्थिती हाताबाहेर; चोवीस तासांत ३१ मृतांवर अंत्यसंस्कार

Next

कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी पहिल्या लाटेत ज्या गतीने कोरोनाचे रुग्ण वाढले, त्याच्या पेक्षा अधिक गतीने दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत आहेत. काही दिवसांपासून जिल्ह्यात रोज ४०० ते ५०० तर कोल्हापूर शहरात १०० ते २०० नवीन रुग्ण वाढत आहेत. मृत्यूदेखील रोज दहा ते बारा होत आहेत. सोमवारी तर तब्बल ३४ रुग्णांचा शहरातील विविध रुग्णालयांत मृत्यू झाला. यावर्षीची ही सर्वाधिक संख्या आहे.

एक महिन्यात (दि. १८ मार्च ते १८ एप्रिल) जिल्ह्यात कोरोनाचे नवीन ६२५७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील २७२३ रुग्णांचा समावेश आहे. यावरूनच कोरोना रुग्णसंख्या वाढीचा अंदाज येऊ लागला आहे. याच गतीने रुग्णसंख्या वाढायला लागली तर पुढील दहा दिवसांत आणखी सहा ते साडेसहा हजार रुग्ण वाढून कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे.

- ३४ जणांचा मृत्यू, स्मशानभूमीवर ताण -

कोल्हापूर शहर कोरोना रुग्णावरील उपचाराचे एक प्रमुख केंद्र असल्याने येथे जिल्ह्यातील तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्णही मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातील एखादा रुग्ण अत्यवस्थ असला की त्याला कोल्हापूरला आणले जात आहे. शहरातील रुग्णालयात मृत होणाऱ्या कोल्हापूर शहरातील, जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील व्यक्तींवर कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे येथील स्मशानभूमीवर प्रचंड ताण पडला आहे. गेल्या चोवीस तासांत ३४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी ३१ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर अन्य दोन मृतदेह सोमवारी रात्रीपर्यंत अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत होते. सकाळी दहा वाजल्यापासून अव्याहतपणे हे काम सुरू होते.

- स्मशानभूमीत अपुरे कर्मचारी-

स्मशानभूमीत सध्या तीन पाळ्यांत मिळून २० कर्मचारी काम करत आहेत. परंतु अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या लक्षात घेता २० कर्मचारीही अपुरे ठरत आहेत. आणखी जादा कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती होण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Corona situation out of hand; Funeral on 31 dead in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.