ग्रामीण भागामध्ये कोरोना स्प्रेडर सैराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:26 AM2021-05-25T04:26:01+5:302021-05-25T04:26:01+5:30
संदीप बावचे जयसिंगपूर : कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागालादेखील कोरोनाचा विळखा अधिक घट्ट ...
संदीप बावचे
जयसिंगपूर : कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागालादेखील कोरोनाचा विळखा अधिक घट्ट झाला आहे. ५२ दिवसांत साडेतीन हजारांहून अधिक नवे रुग्ण शिरोळ तालुक्यात आढळून आले आहेत. त्यामध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांचा अधिक समावेश असून, विशेषत: अनेक रुग्ण अंगावर आजार काढत असल्याने त्याचा फैलाव वाढत असल्याचे पुढे येत आहे. कोरोनामुळे घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांनी क्वॉरंटाईन राहून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गतवर्षी कोरोना महामारीमुळे मोठे संकट ओढावले होते. बाधित रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन गरजेनुसार संबंधितावरही उपचार केले जात होते. मात्र, सध्या कोरोनाची दुसरी लाट चिंतेची बाब बनली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गतवर्षी ज्या पद्धतीने नागरिकांनी काळजी घेतली त्या प्रमाणात या दुसऱ्या लाटेत काळजी घेतली जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गणेशवाडीसारखे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार जवळपास ४०० हून अधिक लोक घरी उपचार घेत आहेत. यातील काही रुग्ण बाहेर फिरतात. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांसाठी तालुक्यात २२ शाळा देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाचे आवाहन
होमक्वॉरंटाईन असलेले रुग्ण चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बाहेर फिरत असल्याने ते स्प्रेडर ठरत आहेत. मला काही लक्षणे नाहीत, मी आता बरा आहे, असे सांगत बाहेर फिरल्यामुळे संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी अलगीकरण कक्षात राहून दिलेला कालावधी पूर्ण करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.