कोरोना संशयिताचा मृत्यू, अंत्यविधीसाठी बैतुलमाल कमिटी आली धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 04:25 PM2020-07-24T16:25:50+5:302020-07-24T16:29:57+5:30
इचलकरंजी येथील कोरोना संशयिताचा सीपीआर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले. मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा त्यांचा प्रश्न होता. अशावेळी बैतुलमाल कमिटी त्यांच्या मदतीला धावून आली.
कोल्हापूर : इचलकरंजी येथील कोरोना संशयिताचा सीपीआर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले. मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा त्यांचा प्रश्न होता. अशावेळी बैतुलमाल कमिटी त्यांच्या मदतीला धावून आली.
कोल्हापूर येथील बैतुलमाल कमिटीचे सदस्य बुधवारी (दि. २२) दुपारी मुस्लिम समाजातील तीन व्यक्ती मृत झाल्याने सीपीआर येथे अंत्यविधीच्या मदतीसाठी गेले होते. तेथे दुपारी अतिदक्षता विभागाबाहेर एक दाम्पत्य जोरात आक्रोश करीत होते.
याबाबत नगरसेवक तौफिक मुल्लाणी, राजू नदाफ यांनी त्या दाम्पत्याची चौकशी करून त्यांचा इचलकरंजी येथील स्थानिक नगरसेवक रणजित जाधव यांच्याशी संपर्क करून दिला. त्यांनी मृत महिलेच्या पतीला कोल्हापूर पाठवतो; पण अंत्यसंस्कार तेथेच करा, असे सांगितल्याने बैतुलमाल कमिटीचे मौलाना जाफर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री त्या महिलेच्या मृतदेहावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
या परिवाराला कोल्हापुरातील काहीही माहिती नसल्याने अंत्यसंस्काराच्या सर्व प्रक्रिया पार पाडण्यात बैतुलमाल कमिटीच्या मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला व अचानक घडलेल्या दु:खाने हतबल झालेल्या कुटुंबाला आधारही दिला. या कुटुंबाने अतिशय भावनिक होऊन सर्व मुस्लिम बांधवांचे आभार मानले. मृताचा कोरोना अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
यावेळी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, नवेझ मुल्ला ,राजू नदाफ, जाफर मलबारी, वासीम चाबूकस्वार, सैफुल्ला मलबारी, लालू मीरशिकारी, सादिक रंगरेज, जाफर महात आणि कोल्हापूर महानगरपालिका, सीपीआर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
बैतुलमाल कमिटीच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीत दुसरा अंत्यसंस्कार करण्यात आला. यापूर्वी गेल्या आठवड्यात इचलकरंजीतीलच कोरोना रुग्ण असलेल्या हिंदू मृत व्यक्तीवर अशाच पद्धतीने मुस्लिम तरुणांनी अंत्यसंस्कार केले.