CoronaVirus Kolhapur updates- कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा निर्णय २४ तासांच्या आत मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 12:56 PM2021-04-07T12:56:43+5:302021-04-07T13:00:26+5:30
CoronaVirus Kolhapur updates- अन्य जिल्ह्यातून कोल्हापूरात येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने २४ तासांच्या आत मागे घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी सकाळी नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही बंधनाशिवाय कोल्हापुरात प्रवेश करता येणार आहे. मात्र या नागरिकांची स्वॅब तपासणी व सात दिवस गृह किंवा संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे आहे.
कोल्हापूर : अन्य जिल्ह्यातून कोल्हापूरात येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने २४ तासांच्या आत मागे घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी सकाळी नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही बंधनाशिवाय कोल्हापुरात प्रवेश करता येणार आहे. मात्र या नागरिकांची स्वॅब तपासणी व सात दिवस गृह किंवा संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यात सर्वाधीक प्रमाण अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे आहे. यावर पर्याय काढत मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अन्य जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांना तसेच जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात राहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना ४८ तासांच्या आत आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केल्याचा आदेश काढला होता.
ही चाचणी केलेल्या तसेच न करता परस्पर घरी गेलेल्या नागरिकांचे सात दिवस गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे केले होते. या सगळ्यावर ग्राम समिती व प्रभाग समितीचे नियंत्रण असेल असे आदेशात नमूद होते.
मात्र बुधवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल सक्तीचा आदेश मागे घेण्यात आला. या आदेशामुळे नागरिकांना अधिक त्रास होण्याची शक्यता असल्याने तो मागे घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यातील नागरिकांना कोल्हापुरात विनासायास प्रवेश करता येणार आहे. मात्र राज्य शासनाच्या सध्याच्या नियमानुसार अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची स्वॅब तपासणी व सात दिवसांचे अलगीकरण हा नियम कायम ठेवला आहे.
गावांमध्ये तंट्याचे कारण
चाचणी प्रमाणपत्र व परगावहून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश द्यायचा की नाही, त्यांचे संस्थात्मक किंवा गृह विलगीकरण करायचे याचे सर्वाधिकार ग्राम व प्रभाग समित्यांना देण्यात आले होते. त्यामुळे हे वादाचे कारण ठरले असते. शिवाय एक- दोन दिवसांसाठी किंवा काही तासांसाठी कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय त्रासाचा ठरला असता.