खासगी लॅबमधील कोरोना तपासणीची नोंद ‘आयजीएम’मध्ये करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:38 AM2021-05-05T04:38:15+5:302021-05-05T04:38:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील अनेक नागरिकांची खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणी केली जाते. मात्र, याची नोंद आयजीएम हॉस्पिटलमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील अनेक नागरिकांची खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणी केली जाते. मात्र, याची नोंद आयजीएम हॉस्पिटलमध्ये करण्यात येत नाही. त्यामुळे याची नोंद करावी; अन्यथा संबंधित लॅबवर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक मधुकर झोरे यांनी प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील यांना दिले.
निवेदनात, शहर व परिसरातील नागरिकांसाठी आयजीएम हॉस्पिटल कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी तपासणी होणाऱ्या कोरोना रुग्णांची नोंद ठेवली जाते; पण काही जण खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणी करतात, याची नोंद कोठेही होत नाही. त्यामुळे त्यातील काही पॉझिटिव्ह रुग्ण शहरात बिनधास्त वावरत असल्याने शहरात कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटल व लॅबमध्ये केलेल्या कोरोना तपासणीची नोंद आयजीएम हॉस्पिटलमध्ये करण्यात यावी. तसेच प्रभाग समिती सदस्यांनादेखील याची माहिती द्यावी, असे म्हटले आहे.