कोरोनाचे तीन बळी, ३३ नवीन रुग्ण; वाढता धोका कायम : कोल्हापुरातील २४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:31 AM2021-02-25T04:31:34+5:302021-02-25T04:31:34+5:30
कोल्हापूर : धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ३३ रुग्ण आढळून आले, तर तीनजणांचा मृत्यू झाला. विशेष ...
कोल्हापूर : धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ३३ रुग्ण आढळून आले, तर तीनजणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या ३३ नवीन रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २४ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही वाढ कमी वाटत असली, तरी ती धोकादायक आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी संपलेल्या चोवीस तासांत शासकिय प्रयाेगशाळेतील आरटीपीसीआर व ॲन्टिजेन अशा ६५३ चाचण्यांचे, तर खासगी रुग्णालये व खासगी प्रयोगशाळातील ३७० चाचण्यांचे अहवाल सीपीआर प्रशासनाला प्राप्त झाले. त्यातून ३३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले, तर कोरोनाने तिघांचा बळी घेतला.
मंगळवार पेठेतील ६९ वर्षीय पुरुष, पट्टणकोडोली येथील ६९ वर्षीय पुरुष आणि कर्नाटकातील इंगळी (ता. चिकोडी) येथील ६२ वर्षीय पुरुष यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तिघांचेही मृत्यू सीपीआर रुग्णालयात झाले. बुधवारी १८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याचे सांगण्यात आले.
- कोल्हापूर शहराला मोठा धोका -
कोल्हापूर शहरात मंगळवारी ३२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते, तर बुधवारी आणखी २४ रुग्णांची नव्याने भर पडली. मागच्यावर्षी कोल्हापूर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. बघता बघता कोरोनाची संख्या वाढली होती. हा आकडा आता १५ हजार ५५६ वर जाऊन पोहोचला आहे. या आकडेवारीवरूनच संसर्ग फैलावण्याची गती आणि त्याचे वास्तव स्पष्ट होते. गेल्या दोन दिवसांत कोरोनाची संख्या वाढत असल्याने शहराला पुन्हा एकदा धोका संभविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- खासगी प्रयोगशाळेत जास्त पॉझिटिव्ह-
अमरावती जिल्हयात खासगी प्रयोगशाळेतून जाणीवपूर्वक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढविणारे एक रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप एका जिल्हा परिषद सदस्याने करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी प्रयोगशाळा आणि शासकीय प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्या व पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्ण संख्येवर सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत. जिल्ह्यात मंगळवारी ४७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यापैकी २७ पॉझिटिव्ह रुग्णांची चाचणी खासगी प्रयोगशाळेत झाली होती. बुधवारी जे ३३ रुग्ण आढळून आले त्यापैकी २९ रुग्णांची चाचणी ही खासगी प्रयोगशाळेत झाली आहे..
(फोटो : स्वॅब तपासणी-केएमसी व सीपीआर या नावाने पाठविले आहेत.)