कोरोनाने घेतले पाच बळी; रुग्णसंख्याही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:21 AM2020-07-23T11:21:19+5:302020-07-23T11:27:21+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, ती आरोग्य यंत्रणेच्या हाताबाहेर जात असल्याचे दिसत आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे कोल्हापूरकर घरात बसले असतानाच रोज कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहून परिस्थिती कोठेपर्यंत जाणार याची चिंता आता प्रशासनाला सतावत आहे. बुधवारी चोवीस तासांत पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २१२ रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा तीन हजारांचा टप्पा पार झाला.

Corona took five victims; The number of patients also increased | कोरोनाने घेतले पाच बळी; रुग्णसंख्याही वाढली

कोरोनाने घेतले पाच बळी; रुग्णसंख्याही वाढली

Next
ठळक मुद्देकोरोनाने घेतले पाच बळी; रुग्णसंख्याही वाढलीलहान मुलेही कोरोनाच्या विळख्यात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, ती आरोग्य यंत्रणेच्या हाताबाहेर जात असल्याचे दिसत आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे कोल्हापूरकर घरात बसले असतानाच रोज कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहून परिस्थिती कोठेपर्यंत जाणार याची चिंता आता प्रशासनाला सतावत आहे. बुधवारी चोवीस तासांत पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २१२ रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा तीन हजारांचा टप्पा पार झाला.

गेल्या काही दिवसांत कोरोनाने कोल्हापूरकरांच्या मनात धडकी बसविली आहे. रोज २०० ते २५० कोरोनाबाधित रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे ही संख्या आणखी तीन-चार दिवस अशीच राहिली तर रुग्णांना ठेवायचे कोठे आणि त्यांच्यावर उपचार करायचे कसे, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर आहे. पुढच्या काळात उपचार करणेदेखील एक आव्हान असणार आहे.

कोरोना तालुका निहाय आकडेवारी

बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या माहितीनुसार तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- १०३, भुदरगड- ९२, चंदगड- ३२४, गडहिंग्लज- १७६, गगनबावडा- ७, हातकणंगले- १८१, कागल- ७४, करवीर- २२६, पन्हाळा- १२१, राधानगरी- १०४ , शाहूवाडी- २२९, शिरोळ- ८१, नगरपरिषद क्षेत्र- ६८७ , कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ४८२ आणि जिल्हा व राज्यातील ५२ असे मिळून एकूण ३०३९ रुग्णांची संख्या आहे.


एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्ण मृत होण्याचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. मागच्या चोवीस तासांत पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये इचलकरंजीतील तीन, त्यापैकी दोन पुरुष व एका महिलेचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. सीपीआरने दिलेल्या बुलेटीनमध्ये साजणी येथील ५५ वर्षांचा पुरुष, रायगड कॉलनी, कोल्हापूर येथील ७३ वर्षीय महिलेचा त्यामध्ये समावेश आहे.

जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण २:१

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ३०३५ रुग्ण आढळले, त्यापैकी १०७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यातल्या त्यात ही एक जमेची बाजू आहे. परंतु नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे २:१ असे आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक असून, त्याचा आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे.

लहान मुलेही कोरोनाच्या विळख्यात

जिल्ह्यातील लहान मुले कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याची बाब समोर येऊ लागली आहे. लहान मुलांना तसेच साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना गर्दीत मिसळण्यास, शहरातून फिरण्याला मज्जाव करण्यात येत आहे. लहान मुलांच्याबाबत पालक अजूनही उदासीन असल्यासारखे दिसते. बुधवारी पाच ते अकरा वर्षे वयोगटातील बारा मुलांना कोरोनाची लागण झाली.

कोल्हापूर शहरातील यादवनगर येथील एकाच घरातील चार मुलांना कोरोना झाला. गंजीमाळ येथील नऊ महिन्यांच्या बाळाला, सुधाकरनगर येथील चार वर्षांच्या मुलास, राजारामपुरी येथील अकरा वर्षांच्या मुलीस, शिये येथील आठ वर्षांच्या मुलीस, उचगाव येथील एक वर्षाच्या मुलीस, पाटील मळा इचलकरंजी येथील आठ वर्षांच्या मुलीस, तर हुपरी येथील तीन वर्षांच्या व अकरा वर्षांच्या मुलास कोरोनाची लागण झाली. त्यामुळे लहान मुलांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी पालकांवर आली आहे.

इचलकरंजी ठरले हॉटस्पॉट

इचलकरंजी शहरात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ५०३ रुग्ण आढळून आले असून, तेथे २८ जणांचा मृत्यू झाला आहे. वस्त्रनगरी म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या या शहरात देशभरातील अनेक राज्यांतून कामगार येथे काम करण्यास येतात. परंतु कोरोनाने या शहरात आपली दहशत निर्माण केल्याने सर्व व्यवहार विस्कळीत झाले आहेत.

Web Title: Corona took five victims; The number of patients also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.