आज पुन्हा कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:16+5:302021-01-19T04:26:16+5:30
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम आज मंगळवारी राबवण्यात येणार आहे. यासाठी नवे १,१०० वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी ...
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम आज मंगळवारी राबवण्यात येणार आहे. यासाठी नवे १,१०० वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची यादी तयार करण्यात आली आहे. याआधीच्या यादीतील कर्मचाऱ्यांनाही लस घेता येणार असल्याचे सांगण्यात आले.
लसीकरणाच्या पहिल्या दिवशी शनिवार दि. १६ जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ११ ठिकाणी लसीकरण करण्यात आले होते. त्याच केंद्रावर पुन्हा नव्याने लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील १,१०० पैकी ५७० जणांनी लस टोचून घेतली. आता दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी सकाळी ९ ते ५ या कालावधीत लसीकरण केले जाणार आहे. यासाठी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री मोबाइलवर मेसेज पाठवण्यात आले. शनिवारी ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांनाही मंगळवारी लस घेणे शक्य आहे. जितकी लस जिल्ह्यात आली आहे त्या पध्दतीने आगामी लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ११ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ७ जणांचा समावेश आहे. कागल तालुक्यातील ३ आणि हातकणंगले तालुक्यातील एका रुग्णाचाही यामध्ये समावेश आहे. दरम्यान, एकाचाही मृत्यू झालेला नाही. दिवसभरामध्ये २१७ जणांची तपासणी करण्यात आली असून २७५ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून ११५ जणांची ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. सध्या ९५ जणांवर उपचार सुरू आहेत.