गरोदर मातांचेही दोन दिवसांत कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:25+5:302021-07-14T04:26:25+5:30
कोल्हापूर : सर्वसामान्य नागरिकांबराेबरच आता जिल्ह्यातील गरोदर मातांचेही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पुढील दोन-तीन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. यामुळे ...
कोल्हापूर : सर्वसामान्य नागरिकांबराेबरच आता जिल्ह्यातील गरोदर मातांचेही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पुढील दोन-तीन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. यामुळे ही लस गरोदर मातांसाठी सुरक्षित आहे की नाही, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गरोदर माता ज्या आरोग्य केंद्रामध्ये नियमित तपासणीसाठी जात असेल तेथेच त्यांना ही लस दिली जाणार आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू असून, मोठ्या प्रमाणात लसीकरणदेखील केले जात आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत केंद्राच्या आरोग्य विभागाकडून गरोदर मातांना ही लस देण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात आले होते. शिवाय त्याच्या सुरक्षिततेबाबत वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. पण आता शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील गरोदर मातांनाही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, लसीकरण अधिकारी डॉ. फारुख देसाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, महिला व बालकल्याण अधिकारी सोमनाथ रसाळ, डॉ. हर्षला वेदक, बालरोग तज्ज्ञ डॉ. संगीता कुंभोजकर, डॉ. अमोल माने, मनपा आरोग्य आधिकारी डॉ. पावरा, डॉ. सुहासिनी कडे उपस्थित होत्या.
तिसऱ्यांदा, दुसऱ्यांदा व पहिल्यांदा बाळाला जन्म देत असलेल्या माता असे वर्गीकरण करण्यात येणार आहे. गरोदर माता ज्या दवाखान्यात, आरोग्य केंद्रात नियमित तपासणीसाठी जाते, तेथेच त्यांना ही लस दिली जाणार आहे.
--
दहा लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्याला १८ वर्षांपुढील ३१ लाख २६ हजार ९१७ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १० लाख ७७ हजार ६८० नागरिकांना पहिला व ३ लाख ९४ हजार २८० नागरिकांचा दुसरा डोस झाल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील ६० वर्षांपुढील ७८ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून, हे प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तर ४४ टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्याला मिळणाऱ्या लसीपैकी ९० टक्के लस दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने देण्यात येणार आहे.
--
फोटो नं १२०७२०२१-कोल-कोरोना लसीकरण
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना लसीकरणाची आढावा बैठक झाली.
---