शहरात ४६ हजार व्यक्तींना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:26 AM2021-03-23T04:26:05+5:302021-03-23T04:26:05+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीत गेल्या दोन महिन्यांच्या काळात ४५ हजार ८२५ व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली. सोमवारी एका ...
कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीत गेल्या दोन महिन्यांच्या काळात ४५ हजार ८२५ व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली. सोमवारी एका दिवसात २२२० व्यक्तींना ही लस टोचली गेली. नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन शहरात आणखी पाच ठिकाणी लस टोचण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
लसीकरणाकरिता यापूर्वी सुरू असलेल्या १२ सरकारी व १४ खासगी हॉस्पिटल येथे लस उपलब्ध असून यामध्ये आता शहरात नव्याने विंस हॉस्पिटल, शाहूपुरीतील मेट्रो हॉस्पिटल, शिवाजी पेठेतील दत्त साई हॉस्पिटल, बसंतबहार टॉकीज जवळील प्रिस्टीन हॉस्पिटल व राजारामपुरीतील मोरया हॉस्पिटल अशा पाच खासगी रुग्णालयात लस देण्यात येणार आहे.
आतापर्यंत फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य सेवेतील कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक मिळून ४५ हजार ८२५ व्यक्तींना लस टोचण्यात आली. त्यामध्ये साठ वर्षांवरील १९ हजार ९७६ व्यक्तींचा तर सहव्याधी असलेल्या ४२४० व्यक्तींचा समावेश आहे.
शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिक मास्कचा वापर तसेच शारीरिक अंतर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पथके तयार करुन ठिकठिकाणी अशा नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी एका दिवसात १९२ व्यक्तींवर मास्क न वापरल्याबद्दल तर तीन व्यक्तींवर शारीरिक अंतर न राखल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली.