आजरा तालुक्यातील कोरोना लस संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:25 AM2021-04-09T04:25:41+5:302021-04-09T04:25:41+5:30
आजरा : आजरा तालुक्यात आलेली कोरोनाची लस संपली आहे. चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतून लस देण्याचे काम गुरुवारपासून थांबले आहे. ...
आजरा : आजरा तालुक्यात आलेली कोरोनाची लस संपली आहे. चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतून लस देण्याचे काम गुरुवारपासून थांबले आहे. ग्रामीण रुग्णालयात एक दिवस पुरेल इतकीच लस शिल्लक आहे. तालुक्यात २१३४६ नागरिकांना कोरोनाची लस गुरुवारअखेर देण्यात आली.
तालुक्यात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन अशा दोन प्रकारच्या लसी देण्यात आल्या होत्या. ग्रामीण रुग्णालयासह वाटंगी, उत्तूर, भादवण, मलिग्रे या प्राथमिक आरोग्य केंद्रांसह गावागावांतील उपकेंद्रांवरही कोरोनाची लस देण्यात आली.
गावोगावी केलेले प्रबोधन यामुळे गेल्या चार दिवसांपासून नागरिकांनी कोरोनोची लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यातच सध्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी लस घेण्यास सुरुवात केली होती. तालुक्यात २१३४६ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे.
तालुक्यात कोरोनाची लस घेतल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला त्रास झालेला नाही, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय कोरोना लस दिलेली संख्या अशी : ग्रामीण रुग्णालय आजरा - ५३३८, उत्तूर - ४७७७, वाटंगी - ३७०७, भादवण - ३२०५, मलिग्रे - ४३१९ अशी एकूण २१३४६ लोकांना कोरोनाची लस दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्येक गावातील ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस दिली आहे.
शासनाकडून बुधवार (दि. ७) पासून कोरोनाची लस न आल्यामुळे शिल्लक असलेली कोरोनाची लस संपली आहे. त्यामुळे लस देण्याचे काम थांबले आहे. आज, शुक्रवारी सकाळी कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र लस संपल्याचे जाहीर होताच लस न घेताच नागरिकांना घरी परतावे लागले.