Corona vaccine Kolhapur : शिरोळवर जिव्हाळा, करवीरकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 01:49 PM2021-07-19T13:49:25+5:302021-07-19T13:55:17+5:30

Corona vaccine Kolhapur :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण हे करवीर तालुक्यात सापडले आहेत. आताही जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण याच तालुक्यात असताना लस वाटपात मात्र सापत्नभावाची वागणूक आरोग्य विभागाकडून दिली जात आहे.

Corona vaccine Kolhapur: Jivhala on the top, eye to eye on Karveer | Corona vaccine Kolhapur : शिरोळवर जिव्हाळा, करवीरकडे कानाडोळा

Corona vaccine Kolhapur : शिरोळवर जिव्हाळा, करवीरकडे कानाडोळा

Next
ठळक मुद्देलस वाटपात सापत्नभावाची वागणूक सर्वाधिक बाधित असतानाही लस कमी

राजाराम लोंढे

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण हे करवीर तालुक्यात सापडले आहेत. आताही जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण याच तालुक्यात असताना लस वाटपात मात्र सापत्नभावाची वागणूक आरोग्य विभागाकडून दिली जात आहे. लोकसंख्या व रुग्ण पाहता आरोग्य राज्यमंत्र्यांच्या शिरोळ तालुक्यावर आरोग्य विभागाचा जरा अधिकच जिव्हाळा असून, करवीरकडे मात्र कानाडोळा केल्याने संतप्त भावना उमटत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेली तीन महिने सगळ्यांनाच मेटाकुटीला आणले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहेच, त्याचबरोबर लसीकरणही महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने मोफत लसीकरण सुरू केले आहे. मात्र, त्याचा पुरवठा आणि डोस घेणाऱ्यांची संख्या पाहिली, तर फार मोठी तफावत आहे. मुळात सरकारकडून लस कमी मिळत आहेत. त्यातच लस वाटपात असमानता होत असल्याने सामान्य माणसाला लसीपासून वंचित राहावे लागत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी रविवारी लसीचे ४५ हजार डोस आले. त्याचे वाटप आरोग्य यंत्रणेने केले असून, यामध्ये हातकणंगले तालुक्याला सर्वाधिक ९,२००, शिरोळ तालुक्यासाठी ४,१६०, तर करवीर तालुक्याला ४,५६० डोस देण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून करवीर तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. रविवारीही तब्बल ५१४ रुग्ण एकट्या करवीरमधील आहेत. मात्र, त्या तुलनेत लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीविना नागरिकांना रांगेतूनच परत जावे लागत आहे.

येथेही शिरोळलाच झुकते माप

सरकारी यंत्रणेकडून कोरोनाची मोफत लस मिळत नसल्याने आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयाला लस देण्यास परवानगी दिली आहे. येथेही हातकणंगले व शिरोळ तालुक्यांना प्रत्येकी बारा रुग्णालयांना परवानगी दिली आहे, त्या तुलनेत करवीरमधील पाच रुग्णालयांचा समावेश आहे.


राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कोल्हापुरात मात्र वाढत आहे. रुग्णसंख्या अटोक्यात आणण्याबरोबरच लसीकरणात ते अपयशी ठरले आहेत. ज्या तालुक्यात रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे तरी जादा डोस देणे अपेक्षित असताना, येथेही दुजाभाव करणे योग्य नाही.
-बाबासाहेब देवकर,
माजी सदस्य, जिल्हा परिषद

रविवारची तालुकानिहाय रुग्णसंख्या आणि लसीचे डोस

तालुका            रुग्ण         आज मिळाला डोस

  • आजरा          १०८                 १,७१०
  • भुदरगड         ९०                  १,८९०
  • चंदगड            २०                  २,५६०
  • गडहिंग्लज    ११२                 ३,२८०
  • गगनबावडा       ३                    ५००
  • हातकणंगले   ३२८               ९,२००
  • कागल            १६७               २,५८०
  • करवीर           ५१४               ४,५६०
  • पन्हाळा          १३८              २,६४०
  • राधानगरी       १३६              २,६६०
  • शाहूवाडी          ७४                २,९२०
  • शिरोळ           २२६                ४,१६०

Web Title: Corona vaccine Kolhapur: Jivhala on the top, eye to eye on Karveer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.