राज्यातील २८ हजार पोलीस पाटलांना कोरोना लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:28 AM2021-03-01T04:28:36+5:302021-03-01T04:28:36+5:30
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून पोलीस पाटील हा आरोग्य विभाग, महसूल, पोलीस व ग्रामप्रशासनाबरोबर काम करणारी व्यक्ती आहे. परराज्यातील कामगार पाठवणी ...
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून पोलीस पाटील हा आरोग्य विभाग, महसूल, पोलीस व ग्रामप्रशासनाबरोबर काम करणारी व्यक्ती आहे. परराज्यातील कामगार पाठवणी असो अथवा बाहेरून आलेली व्यक्तीची माहिती व तपासणी असो, गावातील कोरोना पेशंट व्यवस्था असो अथवा गृहभेटी, सर्व्हे, ग्रामस्थांना या रोगाबाबत जनजागृती असो, लॉकडाऊन नियमाचे पालन असो, यासारख्या सर्व कामांत पोलीस पाटील आरोग्य विभाग, महसूल, पोलीस व ग्रामप्रशासनाबरोबर सचिव म्हणून काम करीत आहे. पोलीस पाटलांनी स्वतःच्या व आपल्या कुटुंबाची आरोग्याची काळजी केली नाही. काही पोलीस पाटलांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागणही झाली आहे. असे असताना पोलीस पाटलांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. सध्या कोरोनासंदर्भात लस देण्याचा उपक्रम सरकार राबवीत आहे. यावेळी कोरोना लस देताना पोलीस पाटलांना प्राथमिकता देणे आवश्यकता असतानाही पोलीस पाटलांसंदर्भात उदासीनता दिसून येते. त्यामुळे जो पोलीस पाटील आरोग्य विभाग, महसूल, पोलीस व ग्रामप्रशासनाबरोबर कुटुंबाची काळजी न करता आपल्या गाव, तालुका व जिल्ह्यासाठी काम करतो अशा पोलीस पाटलांना कोरोना लस द्यावी, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रियाज मुजावर, दिलीप महाडिक, नयन पाटील, मारुती हेगडे, सचिन कुंभार, अमजद पठाण, पंढरीनाथ गायकवाड, नितेश तराळ, बाबासाहेब पाटील, संतोष लोहार सहभागी होते.