कोरोना दक्षता समिती कोमात, नागरिक जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:09+5:302021-04-17T04:23:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबा तारळे : गतवेळी लॉकडाऊनच्या काळात छातीची ढाल करून कोरोनाला गावाच्या वेशीबाहेरच रोखून कोरोना संसर्गापासून गावकऱ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा तारळे : गतवेळी लॉकडाऊनच्या काळात छातीची ढाल करून कोरोनाला गावाच्या वेशीबाहेरच रोखून कोरोना संसर्गापासून गावकऱ्यांना चार हात लांब ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘कोरोना दक्षता समिती’ने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनाची वाढती महामारी रोखण्याचे प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे.
गतवर्षी २२ मार्चला जनता कर्फ्यू, तर २४ मार्चपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनला सुरुवात झाली. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत स्तरावर कोरोना दक्षता समिती स्थापन करण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गावातील सर्वच स्थरातील युवा कार्यकर्त्यांची मोट बांधून ‘कोरोना दक्षता समिती’ची स्थापना करण्यात आल्या. या समितीच्या सचिव पदाची धुरा पोलीस पाटलांकडे देण्यात आली.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात या कोरोना दक्षता समितीने गावच्या चारी दिशा सील केल्या. अति महत्त्वाच्या व्यक्तींबरोबरच अत्यावश्यक सेवेसाठीच परवानगी घेऊन गावात प्रवेश दिला जायचा. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, गाव, मोबाईल नंबर यासाठी डायरी नोंदी ठेवण्यात येऊ लागल्या. आता दिवाळीत विविध परजिल्ह्यांतून आलेल्यांना होम क्वाॅरंटाईन करण्याचीही कडक भूमिका घेतली. इतकी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करीत असताना काही ठिकाणी कोरोना दक्षता समितीला रोशास सामोरे जावे लागले, तर अनेक ठिकाणी वादाच्या घटनाही घडल्या. मात्र, या परिस्थितीतही या समितीने केवळ ग्रामस्थांचे हित डोळ्यांसमोर ठेवून कोरोनाला गावच्या वेशीबाहेर ठेवण्यासाठी छातीची ढाल केली. या समितीतील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडल्या; मात्र याही परिस्थितीत या समितीने जिवाची पर्वा न करता कोरोनाची महामारी रोखण्यासाठी मोठे योगदान दिले.
असे असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना याच दक्षता समितीने गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेकडे पाठ फिरवल्याने दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांबरोबरच वाढणारा संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनावर आहे.
---
गतवेळी लॉकडाऊनच्या काळात कसबा तारळे येथील कोरोना दक्षता समितीने गावात येणारे प्रमुख तिन्ही मार्ग रोखून धरले होते. या कामात ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तरुण मंडळे विविध सेवा संस्थांचे पदाधिकारीही हिरिरीने सहभागी झाले होते. याच सुरक्षा व्यवस्थेचा तालुक्यातील अन्य गावांनी आदर्श घेतला होता.