corona virus : कोरोनावर १०३ वर्षांच्या आजीची मात, व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमधून डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 08:01 PM2020-09-09T20:01:24+5:302020-09-09T20:05:22+5:30
दिगंबर जैन बोर्डिंगमधील व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या बाळाबाई या १०३ वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली. बुधवारी त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून, झाड लावून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ह्यह्यो कोरोना म्हणजे संशयाचा आजार आहे. त्याला हसत-खेळत सामोरे जा, आनंदी रहा,ह्ण असा कानमंत्र देऊन त्या घरी गेल्या. त्यांना निरोप देताना सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.
कोल्हापूर : दिगंबर जैन बोर्डिंगमधील व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या बाळाबाई या १०३ वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली. बुधवारी त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून, झाड लावून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ह्यह्यो कोरोना म्हणजे संशयाचा आजार आहे. त्याला हसत-खेळत सामोरे जा, आनंदी रहा,ह्ण असा कानमंत्र देऊन त्या घरी गेल्या. त्यांना निरोप देताना सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.
सम्राटनगरमध्ये राहणाऱ्या या आजींचे नाव बाळाबाई विठ्ठल मोकाशी. १० दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील सगळ्याच व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आणि इतक्या वयोवृद्ध रुग्णाची जोखीम घ्यायला कोणताही दवाखाना तयार नव्हता. अखेर त्यांना व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. या आजींना कोरोनाची लक्षणे नव्हती; पण वय आणि औषधोपचारांना त्या कसा प्रतिसाद देतात, यावरही बरेच अवलंबून होते.
पहिल्या दिवसापासून त्यांच्याभोवतीचे वातावरण अगदी खेळीमेळीत ठेवले गेले. सुरुवातीला जेवणामुळे पोटाचा त्रास झाल्यानंतर त्यांच्या जेवणात अधिक पौष्टिक पदार्थांचा समावेश केला गेला. नंतर घरून जेवण येऊ लागले. आजींची स्मरणशक्ती एकदम चांगली; त्यामुळे आपल्या जुन्या काळातील सगळ्या आठवणी त्या रुग्णांना सांगायच्या, निवांत गप्पा मारीत बसायच्या. मी दारात खूप झाडं लावलीत, पालेभाज्या पण पिकवते, आमच्या घरी बघायला या, असे त्या सगळ्यांना सांगायच्या. रोज सकाळ-संध्याकाळ वाफ, गोळ्या, चूर्ण असा त्यांचा दिनक्रम होता.
सेंटरमध्ये रोज योगा, प्राणायाम, हास्य क्लब घेतला जातो. त्यावेळीही आजी येऊन बसायच्या. जमेल तसे करायच्या. आवारात फिरायच्या. परिणामी १० दिवसांनंतर आजी ठणठणीत बऱ्या झाला. नातू बबन मोकाशी याने त्यांना घरी नेले. बुधवारी आजींचा वाढदिवसही होता. त्यामुळे डिस्चार्ज दिल्यानंतर आवारात केक कापून त्यांना वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या हस्ते लिंबाचे झाड लावण्यात आले.
घरी परतताना आजी म्हणाल्या, ह्यो संशयाचा आजार आहे. लोक संशय घेऊन औषधपाणी करायला जातात. मनात भीती बाळगू नका, आनंदी रहा. इथे माझी छान काळजी घेतली गेली.
त्यांना निरोप देताना सेंटरच्या कर्मचाऱ्यांच्याही डोळ्यांत आनंदाश्रृ आले. यावेळी व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांच्यासह कोल्हापूर मेडिकल असोसिशएनचे डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. गीता पिल्लई, शीतल पाटील उपस्थित होत्या. हीना यादवाड, प्रशांत शेंडे, सेल्विना चव्हाण, अरविंद लवटे, सिद्धेश पाटील, प्रेम पवार, प्रेम सातपुते यांनी परिश्रम घेतले.