corona virus : कोरोनामुक्तीसाठी शहरात १५ हजार लिटर औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 03:40 PM2020-08-20T15:40:29+5:302020-08-20T15:48:48+5:30
कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढाईत कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाने मोठे योगदान दिले. ६७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शहराच्या परिसरात किमान चार वेळा औषध फवारणी करण्यात आली. त्यामध्ये १४ हजार ५०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड, तर ४०० लिटर सायप्रोतीन या औषधी द्रव्याचा फवाणीकरिता वापर करण्यात आला. शहर निर्जंतुकीकरणाची ही मोहीम अव्याहतपणे गेले पाच महिने सुरू आहे.
कोल्हापूर : कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढाईत कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाने मोठे योगदान दिले. ६७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शहराच्या परिसरात किमान चार वेळा औषध फवारणी करण्यात आली.
त्यामध्ये १४ हजार ५०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड, तर ४०० लिटर सायप्रोतीन या औषधी द्रव्याचा फवाणीकरिता वापर करण्यात आला. शहर निर्जंतुकीकरणाची ही मोहीम अव्याहतपणे गेले पाच महिने सुरू आहे.
कोल्हापूर शहरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून महानगरपालिका प्रशासनाने मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून नियोजन करून त्यानुसार शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शहरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आणि महापालिका प्रशासन सक्रिय झाले. ज्या ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळतील, त्या त्या भागांतील तीन किलोमीटरच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येऊ लागले.
सुरुवातीच्या काळात रुग्ण फारच कमी होते. भक्तिपूजानगर, कसबा बावडा परिसरांत रुग्ण आढळून आले. मात्र आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरणाची मोहीम राबिवण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. त्यामुळे जेथे रुग्ण आढळले नाहीत तेथेही औषध फवारणी सुरू राहिली.
महापालिकेकडे सुरुवातीला औषध फवारणीकरिता सहा ट्रॅक्टर होते. नंतर आणखी चार ट्रॅक्टर तातडीने खरेदी केले. संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय झाल्यामुळे १० ट्रॅक्टरांच्या जोडीला अग्निशमन दलाचे चार बंब घेण्यात आले. सोबतीला ७५ स्प्रेयिंग पंपही होते.
एक-एक प्रभाग करीत शहरातील सर्व ८१ प्रभागांचे पहिल्या २० दिवसांतच निर्जंतुकीकरण करण्यात आले. पुढे ही यंत्रणा तशीच कार्यान्वित ठेवण्यात आली. सातत्याने औषध फवारणी सुरू राहिली. रात्रीच्या वेळीही हे काम सुरूच ठेवले. गेल्या पाच महिन्यांत औषध फवारणीच्या किमान चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे यात मोठे योगदान आहे.
कर्मचाऱ्यांना बूट, मास्क, हँडग्लोव्हज
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काम तसे जोखमीचे होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा भाग म्हणून प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना गमबूट, मास्क, रुमाल, हॅन्डग्लोव्हज, सॅनिटायझर, साबण, रेनकोट, आदी वस्तू तत्काळ उपलब्ध करून दिल्या.
सोडियम हायपोक्लोराईड प्राप्त -
- गुजरातस्थित अल्कली कंपनीकडून - १४ हजार लिटर
- महानगरपालिकेकडून खरेदी - ६००० लिटर
- जिल्हा परिषदेकडून मोफत - १००० लिटर
- एकूण सोडियम हायपोक्लोराईट - २१ हजार लिटर
- त्यांपैकी वापरले - १४ हजार ५०० लिटर
- शिल्लक सोडियम हायपोक्लोराईड - ५५५० लिटर
औषध फवारणीकरिता वापरलेली यंत्रणा -
- लहान-मोठे ट्रॅक्टर - १०
- स्प्रेयिंग पंप चार्जेबल - ७५
- अग्निशनम दलाचे बंब - ४
धूर फवारणीकरिता ४०० लिटर सायप्रोतीन
शहरात एकीकडे कोरोना संसर्ग तर दुसरीकडे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण शहर निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईड औषध फवारले जात होत तर डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायप्रोतीन औषधाचा धूर फवारणी केली जात होती. शहरात धूर फवारणीकरिता आतापर्यंत जवळपास ४०० लिटर सायप्रोतीन वापरले गेले.