corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 07:02 PM2020-08-18T19:02:53+5:302020-08-18T19:03:50+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला; तर ३५८ नवीन रुग्ण आढळून आले.
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला; तर ३५८ नवीन रुग्ण आढळून आले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे असल्यामुळे, आरोग्य प्रशासनास काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण काही कमी होत नसल्याने त्याची चिंता मात्र सतावत आहे.
जिल्ह्यात मंगळवारी १९ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ४३९ वर जाऊन पोहोचली आहे; तर नवीन ३५८ रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या १५ हजार ६३१ वर गेली आहे. मागच्या तीन दिवसांत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या दीड हजार आहे. जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण साधारणपणे तीन टक्क्यांपर्यंत असून, ते कमी करण्यात अद्याप प्रशासनास यश मिळाले नसल्याने यंत्रणा त्रस्त आहे.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. पालकमंत्री सतेज पाटील सर्व आरोग्य यंत्रणेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ते सतत सूचना करीत आहेत. काही तातडीचे निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणीही करताना पाहायला मिळत आहे.
८२ हजारांहून अधिक तपासण्या
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ८२ हजार ८७३ इतक्या कोरोना तपासण्या झाल्या आहेत. दहा लाख लोकसंख्येमागे १९ हजार ५५० इतक्या तपासण्यांचे प्रमाण असून, ते देशाच्या तुलनेत जास्त आहे; तर पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचे प्रमाण १८ टक्के आहे.