corona virus : सीपीआरमधील २० हजार लिटरचा ऑक्सिजन टँक कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 04:10 PM2020-08-26T16:10:25+5:302020-08-26T16:11:44+5:30
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये बसविण्यात आलेला २० हजार लिटरचा लिक्विड ऑक्सिजन टँक मंगळवारपासून कार्यान्वित करण्यात आला.
कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये बसविण्यात आलेला २० हजार लिटरचा लिक्विड ऑक्सिजन टँक मंगळवारपासून कार्यान्वित करण्यात आला.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी युद्धपातळीवर निर्णय घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून या टँकच्या खरेदीला मंजुरी दिली होती. आता दिवसाला २७५ रुग्णांच्या ऑक्सिजनची सोय झाली असून, आणखी १२५ रुग्णांसाठी पुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी भेट देऊन याची पाहणी केली. यावेळी डॉ. उल्हास मिसाळ आणि बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे हे उपस्थित होते. ३० फूट उंच, दोन मीटर व्यास असलेला हा लिक्विड टँक असून ४०० क्युबिक मीटर प्रतितास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला.
यातील एक लिटर द्रवापासून ८५० लिटर वायुरूप ऑक्सिजन मिळणार आहे. या टँकमधून सीपीआरमध्ये १७ ठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटांपर्यंत ऑक्सिजनची सुविधा दिली आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चेन्नईतील व्हीआरव्ही एशिया पॅसिफिक कंपनीशी संपर्क साधून हा टँक मागविला. तो बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, शाखा अभियंता अविनाश पोळ, कोल्हापूर ऑक्सिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गाढवे, तांत्रिक व्यवस्थापक रवींद्र देसाई, संजय दिंडे, अभियंता सुजित प्रभावळे, मेंटेनन्स हेड शैलेश धूळशेट्टी, लगमा मधिहाळ, प्रदीप भोपळे यांनी परिश्रम घेतले.