corona virus : कोल्हापुरात २२ जणांचा मृत्यू, ४९० नवीन रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 07:05 PM2020-08-20T19:05:45+5:302020-08-20T19:06:49+5:30
विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन व्हायला आता काही तास बाकी राहिले असताना कोल्हापूर जिल्ह्यावरील कोरोनाचे विघ्न मात्र अद्यापही कायम असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला, तर ४९० नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनामुळे मृत्यूच्या आकड्याने आता पाचशेचा टप्पा ओलंडला असून तो ५२१ वर जाऊन पोहचला आहे.
कोल्हापूर : विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन व्हायला आता काही तास बाकी राहिले असताना कोल्हापूर जिल्ह्यावरील कोरोनाचे विघ्न मात्र अद्यापही कायम असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला, तर ४९० नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनामुळे मृत्यूच्या आकड्याने आता पाचशेचा टप्पा ओलंडला असून तो ५२१ वर जाऊन पोहचला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी तो वाढतच असल्याचे गुरुवारच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले. समाधानाची एक बाब म्हणजे जेवढे नवीन रुग्ण वाढत आहेत, तेवढेच बरे होऊन घरी जात आहेत. मात्र नवीन येणाऱ्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण अद्यापही कायम आहे.
जिल्ह्यात आता एकूण १६ हजार ७७२ एवढी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर मृत्यू झालेल्यांची संख्या ५२१ च्या घरात गेली आहे. कोल्हापूर सारख्या निसर्ग संपन्न जिल्ह्याला कोरोना संसर्गाने आपल्या विळख्यात घेतले असून हा विळखा दिवसे दिवस घट्ट होत आहे. जिल्हा व आरोग्य प्रशासन जोरदार प्रयत्न करत असले तरी त्यांचे प्रयत्न आता अपूरे पडू लागले आहेत.
कोरोनाच्या चाचण्या वाढविल्या असल्या तरी कोरोनाची साखळी तोडण्याचे काम सध्या थांबले आहे. गणेशोत्सव, मोहरम आता सुरु होत असून विविध ठिकाणी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. नागरीकही आता फारशी काळजी घेताना दिसत नाहीत.