corona virus : कोल्हापूर शहरात नवीन २२३ रुग्ण, नऊजणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 02:08 PM2020-08-22T14:08:09+5:302020-08-22T14:09:27+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २२३ नवीन रुग्ण आढळून आले, तर नऊजणांचा मृत्यू झाला. शहरातील ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २२३ नवीन रुग्ण आढळून आले, तर नऊजणांचा मृत्यू झाला. शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या राजारामपुरी, शिवाजी पेठ, कसबा बावडा, मंगळवार पेठ, शाहूपुरी परिसरांत शुक्रवारीही सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
कोल्हापूर शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता ४७१० झाली असून १३९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या राजारामपुरीत शुक्रवारी १९, शिवाजी पेठेत २४, कसबा बावडा येथे १५, मंगळवार पेठेत १३, शाहूपुरीत १२, नागाळा पार्कात १२, जवाहरनगरात पाच रुग्ण आढळून आले.
शहरात हॉटस्पॉट ठरलेले भाग सहाही भाग हे दाट लोकवस्तीचे तसेच छोट्या-छोट्या घरांचे असून नागरिकांचा वावर नजीकचा आहे. त्यामुळे तेथील संसर्ग आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरात बसणाऱ्या नागरिकांनी नंतर मात्र ह्यत्याला काय होतंयह्ण असे म्हणत सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. चौकात, गल्लीत, भाजी मंडईत गर्दी केल्याचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या वाढत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असतानाही नागरिकांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. सोशल डिस्टंन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत होते.