corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात २५ जणांचा मृत्यू, ७६० नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 06:49 PM2020-08-31T18:49:36+5:302020-08-31T18:50:35+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक काही कमी होण्यचे चिन्ह दिसत नाही. सोमवारी नव्याने ७६० रुग्णांची नोंद झाली तर २५ जणांचा मृत्यू झाला असून ही बाब आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे रुग्णांवरील उपचाराचीही पार दैना उडाली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक काही कमी होण्यचे चिन्ह दिसत नाही. सोमवारी नव्याने ७६० रुग्णांची नोंद झाली तर २५ जणांचा मृत्यू झाला असून ही बाब आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे रुग्णांवरील उपचाराचीही पार दैना उडाली आहे.
सोमवारी येथील सीपीआर रुग्णालयात निपाणी येथील एका रुग्ण योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून दगावल्याची घटना घडली. या घटनेला सीपीआर रुग्णालयास जबाबदार धरले असून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नातेवाईक तसेच दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यांनी मृतदेह तब्बल साडेचार तास रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांच्या कार्यालयाबाहेर दारात ठेऊन ठिय्या आंदोलन केले. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसे दिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासमोरील डोकेदुख वाढत चालली आहे. सोमवारी ७६० रुग्णांची नोंद झाल्यामुळे आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या २३ हजार ८०२ वर जाऊन पोहचली आहे. तर २५ जणांच्या मृत्यूमुळे एकूण मृतांचा आकडा ७२४ इतका झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचा दर हा तीन टक्के इतका असून तो देशाच्या तसेच राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे.