corona virus : कोल्हापुरात २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 07:29 PM2020-09-22T19:29:08+5:302020-09-22T19:30:08+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या चोवीस तासांत २६ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर ४७३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ४० हजार ७३५ वर जाऊन पोहोचली असून, २९ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या चोवीस तासांत २६ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर ४७३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ४० हजार ७३५ वर जाऊन पोहोचली असून, २९ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना संसर्गाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा हॉटस्पॉट बनला होता. राज्यातील ज्या काही मोजक्या शहरांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते त्यात कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक पहिल्या दहामध्ये लागला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर चिंता व्यक्त होत होती. राज्याच्या आरोग्य विभागानेही काही महत्त्वाच्या सूचना देऊन तशी अंमलबजावणी करण्यास बजावले होते.
परंतु गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन प्रमुख शहरांतही हीच परिस्थिती आहे. नवीन रुग्ण संख्या कमी होत असल्याने आरोग्य तसेच जिल्हा प्रशासनावरील ताण हलका होत आहे.
जिल्ह्यातील रुग्ण संख्या घटत असली तरी कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मात्र नियंत्रणात आलेले नाही. दररोज २५ ते ३० रुग्ण दगावत आहेत. मरण पावणारे रुग्ण केवळ कोरोनानेच नाही तर अन्य व्याधीही त्याला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यात १३०४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण तीन टक्क्याच्या आसपास आहे.