corona virus : शहरात २८४ नवीन रुग्णांची भर; पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 04:38 PM2020-08-25T16:38:30+5:302020-08-25T16:41:41+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक कायम आहे. गेल्या चोवीस तासांत शहरात नवीन २८४ रुग्ण आढळून आले तर ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक कायम आहे. गेल्या चोवीस तासांत शहरात नवीन २८४ रुग्ण आढळून आले तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. संपूर्ण जिल्ह्यातील सर्वाधिक ५२३८ रुग्ण हे एकट्या कोल्हापूर शहरात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कोल्हापूर शहरात सोमवारी सायंकाळी संपलेल्या चोवीस तासांत शहरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये रंकाळा टॉवर येथील ६७ वर्षीय महिला, शनिवार पेठेतील ५७ वर्षीय पुरुष, उत्तरेश्वर पेठेतील ५९ वर्षीय पुरुष, सुर्वेनगर येथील ५५ वर्षीय पुरुष तर गंजी माळ येथील ४६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या १५५ वर जाऊन पोहोचली आहे.
तसेच ताराबाई पार्क व राजारामपुरीत प्रत्येकी २१ नवीन रुग्ण आढळून आले. त्याखालोखाल कसबा बावडा १८ , शिवाजी पेठ १४, शाहूपुरी १६, जवाहरनगर ११, कदमवाडीत १३, फुलेवाडी ७ सम्राटनगर १० तर मार्केट यार्ड, देवकर पाणंद, सानेगुरुजी, रायगड कॉलनी येथे प्रत्येकी सहा, मंगळवार पेठेत आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहराच्या सर्वच भागांत कोरोनाचे रुग्ण असून संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नेमका आकडा किती?
शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या व त्यामुळे मृत झालेल्यांची संख्या याची आकडेवारी सीपीआर रुग्णालय तसेच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येते; परंतु या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे दिसते.
सीपीआर रुग्णालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार शहरात आतापर्यंतचे रुग्ण ६०११ असून मृत संख्या १४८ इतकी आहे तर त्याचवेळी महापालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५२३८ कोरोना रुग्ण असून मृत १५५ आहेत. या आकडेवारीत मोठी तफावत आहे. त्यामुळे नेमके कोणते आकडे खरे मानायचे, असा प्रश्न आहे.