corona virus : कोल्हापुरात कोरोनाचे दोन दिवसात ३५ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 12:08 PM2020-08-17T12:08:22+5:302020-08-17T12:10:20+5:30
गेल्या ४८ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे ३५ बळी गेले आहेत. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ४०५ वर गेला आहे. आतापर्यंत १४७३७ एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंत ६९०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांतील मृतांमधील सर्वाधिक संख्या ही हातकणंगले तालुक्यातील आहे.
कोल्हापूर : गेल्या ४८ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे ३५ बळी गेले आहेत. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ४०५ वर गेला आहे. आतापर्यंत १४७३७ एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंत ६९०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांतील मृतांमधील सर्वाधिक संख्या ही हातकणंगले तालुक्यातील आहे.
जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पाच ते रविवारी सायंकाळी पाच या २४ तासांत नवे ५८२ रुग्ण सापडले आहेत. तसेच या २४ तासांत तब्बल ६९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवार (१४) ते शनिवारी (दि. १५) सायंकाळच्या २४ तासांत तब्बल २२, तर नंतरच्या २४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, एकीकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील काम चांगले चालले असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी याच्या बरोबर उलटे मत मांडले आहे.
शहरात चार हजारांवर कोरोना रुग्ण
कोल्हापूर शहरात कोरोनाचे तब्बल ४०६८ रुग्ण झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत कोरोनाचा कहर कायम होता. ५३९ नवीन रुग्णांची भर पडली. आत्तापर्यंत ९३ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. एकूण १४३ रुग्ण आढळून आल्याने हॉट स्पॉटच्या यादीमध्ये शाहूपुरी परिसराचा समावेश झाला आहे.
शहरात १५ ऑगस्ट रोजी २६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले; तर रविवारी आणखी २६९ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये शिवाजी पेठ २७, राजारामपुरी १५, कसबा बावडा १५, मंगळवार पेठ १४, शाहूपुरी १९, कदमवाडी १२, शनिवार पेठ १०, जरगनगर ९, सम्राटनगर ९, विचारेमाळ १८ रुग्णांचा समावेश आहे.
हॉट स्पॉटमधील रुग्ण
राजारामपुरी ३७१, शिवाजी पेठ २५३, कसबा बावडा २२३, मंगळवार पेठ २२२, शाहूपुरी १४२, संभाजीनगर १३०, जवाहरनगर ११५
नवीन ३१ परिसर सील
दोन दिवसांमध्ये नव्याने ३१ परिसर सील करण्यात आले आहेत. आतापर्यंत २२८ परिसर सील झाले असून सध्या १३० ठिकाणी बॅरिकेट्स लावून परिसर बंद केले आहेत.
दोन दिवसांत सातजणांचा मृत्यू
गेल्या चार महिन्यांपासून आत्तापर्यंत कोरोनामुळे ९७ जणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत यामध्ये सातजणांचा समावेश आहे. कसबा बावडा येथे ५९ वर्षांची महिला, पाचगाव येथील ५१ वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथे ७६ वर्षांचा पुरुष, जरगनगर येथे ५० वर्षांची महिला, गंगावेश येथे ५४ वर्षांचा पुरुष, जुना वाशी नाका येथे ६० वर्षांचा पुरुष, राजारामपुरी पाचवी गल्ली येथील ५५ वर्षांचा पुरुष यांचा समावेश आहे.