corona virus : जिल्ह्यात कोरोनाचे ४३४ नवे रुग्ण, २२ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 07:35 PM2020-09-28T19:35:28+5:302020-09-28T19:36:07+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती स्थिर असून सोमवारी ४३४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २२ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे सीपीआर रुग्णालय प्रशासनाकडून मिळणाऱ्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती स्थिर असून सोमवारी ४३४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २२ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे सीपीआर रुग्णालय प्रशासनाकडून मिळणाऱ्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्गाचा दाह कमी होत असून रुग्णसंख्या घटत चालली आहे. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात जी परिस्थिती होती, त्याच्या तुलनेत बरीच सुधारणा झाली आहे. रुग्णसंख्या पन्नास टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाचा आत्मविश्वासदेखील वाढत चालला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ४४३ इतक्या रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ३२ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. केवळ कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या अद्याप म्हणावी तितकी नियंत्रणात आलेली नाही, तोच एक चिंतेचा विषय बनला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३९७ रुग्ण कोरोनाचे शिकार ठरले आहेत. दुर्दैवाने हे प्रमाण राज्याच्या पातळीवर काहीसे जादा आहे. मात्र, तरीही हे प्रमाण कमी करण्याकरिता जिल्हा व आरोग्य प्रशासन कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ कोरोनामुक्त
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सोमवारी कोरोनामुक्त झाले. कोरोना महामारीतदेखील सातत्याने जनतेत मिसळून काम करण्याची त्यांची सवय अंगलट आली. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातून ते पूर्णत: बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीने ही आनंदाची पर्वणी होती. आतषबाजी करत रांगोळ्या काढून, फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले.