corona virus : जिल्ह्यात तीन महिन्यांत ५४ हजार ७५७ स्राव तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 04:42 PM2020-08-03T16:42:25+5:302020-08-03T16:45:41+5:30
कोरोनाचा महामारीने कोल्हापूर जिल्ह्यात थैमान घातले आहे. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सुमारे ५४ हजार ७५७ कोरोना संशयितांच्या स्राव चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल ५४०७ जणांची चाचणी अहवाल कोरोना पॉझीटिव्ह प्राप्त झाले आहेत.
कोल्हापूर : कोरोनाचा महामारीने कोल्हापूर जिल्ह्यात थैमान घातले आहे. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सुमारे ५४ हजार ७५७ कोरोना संशयितांच्या स्राव चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल ५४०७ जणांची चाचणी अहवाल कोरोना पॉझीटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३८६० पॉझिटिव्ह अहवाल हे फक्त जुलै महिन्यात प्राप्त झाले. त्यामुळे जुलै महिना कोल्हापूर जिल्ह्यासाठी घातक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. आतापर्यंत सुमारे १९९ पर्यंत कोरोना बळींचा आकडा पोहोचला असताना या महामारीची भीषणता तीव्र होऊ लागली आहे.
मार्चअखेरच्या चार दिवसांत कोरोनाचा शिरकाव कोल्हापूर जिल्ह्यात झाला आणि हळूहळू या कोरोना विषाणूने संपूर्ण जिल्हाच व्यापून टाकला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकाही गावात कोरोनाचा शिरकाव झाल्ना नाही असे एकही गाव सापडणार नाही.
एप्रिल, मे महिन्यात मुंबई-पुण्याकडील प्रवासी वाढल्याने त्यांची लागण कोल्हापूर जिल्ह्याला झाली. पण त्यावेळी परजिल्ह्यांतून येणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संस्थात्मक विलगीकरण कक्षातच वाढता आकडा होता. त्यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या डोळे पांढरे करणारी वाटत होती. पण त्यानंतर जून-जुलै महिन्यात जिल्ह्यात समुह संसर्गाने पाय पसरले अन् प्रत्येक गाव- प्रत्येक गल्लीबोळांत कोरोनाचे रुग्ण सापडू लागले.
मे महिन्यात जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांचे सरसकट स्राव चाचणी करण्यात आली. सुमारे १६८७५ जणांचे स्राव चाचणी केली, त्यामध्ये ४९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पण त्यानंतर फक्त लक्षणे असणाऱ्यांचीच स्राव चाचणी घेण्यात आली, त्यामुळे जून महिन्यात चाचण्यांचे प्रमाण कमी आले, जूनमध्ये ७१६९ जणांची स्राव चाचणी घेतली, त्यामध्ये ३३३ पॉझिटिव्ह चाचण्या प्राप्त झाल्या.
जुलै महिना तर जिल्ह्याच्या दृष्टीने कर्दनकाळच ठरला आहे. या महिन्यात पर जिल्ह्यातून येणाऱ्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न झाला असला तरीही याच महिन्यात समूह संसर्ग वाढला. याच महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक गावाला कोरोनाचा विळखा पडला आहे.
जुलैमध्ये तब्बल २२ हजार २८९ नागरिकांच्या स्राव चाचणी करण्यात आली, त्यामध्ये ३८५९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली. विशेष म्हणजे या सर्व चाचण्या सीपीआर रुग्णालयाच्या शेंडा पार्कमधील प्रयोगशाळेत तपासण्यात आल्या.
त्यामुळे सीपीआरच्या शेंडा पार्क आणि डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातच प्रयोगशाळेत गेल्या तीन महिन्यांत एकूण ५४ हजार ७५७ रुग्णांच्या स्रावाची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ५४०७ अहवाल पॉझिटिव्ह आले तर इतर ४९ हजार २४९ चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
डॉ. डी. वाय. पाटील लॅबमध्ये ७५९८ चाचण्या तपासणी
डॉ. डी. वाय.पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत आतापर्यंत एकूण ८४२४ जणांच्या स्रावच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ७५९८ जण निगेटिव्ह तर ७२५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.