CoronaVirus :कोल्हापुरातील ६९ टक्के रुग्ण उपचारानंतर घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:42 AM2020-06-09T10:42:32+5:302020-06-09T10:43:57+5:30
शहरातील कोरोनाग्रस्त डॉक्टरच्या रुग्णालयातील रिसेप्शनिस्टलाही कोरोना झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यामुळे त्या रुग्णालयात गेल्या महिन्याभरात गेलेल्या रुग्णांच्या पोटात गोळा आला आहे. सोलापूरचे नातेवाईक कोल्हापुरात उपचारासाठी आल्यावर या डॉक्टरचा त्यांच्याशी संपर्क झाल्याचा संशय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६९ टक्के रुग्ण बरे होऊन गेले असून, ३० टक्के उपचार घेत आहेत, तर १ टक्का रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर : शहरातील कोरोनाग्रस्त डॉक्टरच्या रुग्णालयातील रिसेप्शनिस्टलाही कोरोना झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यामुळे त्या रुग्णालयात गेल्या महिन्याभरात गेलेल्या रुग्णांच्या पोटात गोळा आला आहे. सोलापूरचे नातेवाईक कोल्हापुरात उपचारासाठी आल्यावर या डॉक्टरचा त्यांच्याशी संपर्क झाल्याचा संशय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६९ टक्के रुग्ण बरे होऊन गेले असून, ३० टक्के उपचार घेत आहेत, तर १ टक्का रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील रंकाळा टॉवर परिसरातील खासगी रुग्णालयातील ३२ वर्षांच्या डॉक्टरचा अहवाल रविवारी (दि. ७) पॉझिटिव्ह आला होता. त्याच रुग्णालयातील आणि इतर संपर्कात आलेल्या ६० जणांपैकी ५९ अहवाल निगेटिव्ह आले असून, रिसेप्शनिस्टचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे.
या रिसेप्शनिस्टचे माहेर बुधवार पेठेत आहे. याच ठिकाणी त्या राहत होत्या. अंबाई टँक परिसरातील घरातही त्या गेल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवार पेठेतील या महिलेच्या घरातील सदस्यांचा बाहेर वावर असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यात दिवसभरात ४ नवे रुग्ण सापडले असून, एकूण संख्या ६८४ वर गेली आहे. दिवसभरामध्ये १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, एकूण ४७२ रुग्ण बरे झाले आहेत, तर आठजणांचा मृत्यू झाला आहे.