corona virus : मृताच्या साहित्य विक्रीवरही कोरोनामुळे संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:30 PM2020-08-18T12:30:28+5:302020-08-18T12:31:09+5:30
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना थेट प्लास्टिकच्या कागदामधून गुंडाळून दहनासाठी नेले जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मृताच्या साहित्य विक्रीवरही परिणाम झाला आहे. नियमित महिन्याकाठी कोल्हापूर शहरात शंभर ते सव्वाशेजणांचा अपघात, आजारपणामुळे मृत्यू होतो. मात्र, हा आकडा कोरोनामुळे दुप्पट झाला आहे.
सचिन भोसले
कोल्हापूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना थेट प्लास्टिकच्या कागदामधून गुंडाळून दहनासाठी नेले जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मृताच्या साहित्य विक्रीवरही परिणाम झाला आहे. नियमित महिन्याकाठी कोल्हापूर शहरात शंभर ते सव्वाशेजणांचा अपघात, आजारपणामुळे मृत्यू होतो. मात्र, हा आकडा कोरोनामुळे दुप्पट झाला आहे.
हिंदू धर्मातील चालीरितीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याची अंत्ययात्रा काढली जाते. ती तिरडीवरून काढली जाते. मृताचे साहित्य विक्री करणारे मोजकेच लोक शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठेत आहेत. मात्र, या साहित्य विक्रीवरही कोरोनामुळे संक्रांत आली आहे.
कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीमुळे संसर्ग वाढू नये. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता प्लास्टिकच्या कागदामध्ये गुंडाळून दिला जातो. मृताला घरी न नेता थेट स्मशानभूमीत नेऊन दहन करण्याची सक्त सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मृताच्या साहित्य विक्रीवर व अन्य सर्वच विधीवरही परिणाम झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांत ४०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. इतर आजारांनीही तितक्याच लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी कोरोनाविना मृत झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी हे साहित्य नेले. मात्र, जे कोरोनामुळे मृत झाले त्यांच्यावर कोणताच विधी न करता थेट स्मशानभूमीत लाकडी सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी गुलाल नाही, तिरडी नाही की मंत्र नाही.
काय लागते साहित्य..
बांबूच्या काठ्या, गाडगी, सुतळी, गुलाल, खोबरेवाटी, चंदन,पाच मीटर पांढरे कापड,पान, सुपारी, हार असे साहित्य लागते. मृत पुरुष असेल तर त्याला पांढरी टोपी, धोतर, पंचा ,तर सुहासिनी महिला असेल तर तिच्याकरीता हिरवा चुडा, हिरवी साडी, कंगवा फणी, मणी मंगळसूत्र, हळदी-कुंकू (प्रत्येकी अर्धा किलो) लागते. विधवा असेल तर पांढरी साडी लागते. सरासरी हा खर्च दीड हजार रुपयांपर्यंत होत असतो.
आमचा व्यवसाय शंभर वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. मृताच्या साहित्याला कधी मंदी येत नाही, असे लोक म्हणायचे; परंतु कोरोनामुळे ते देखील खोटे ठरविले आहे. गेल्या चार महिन्यांत या साहित्य विक्रीवरही कोरोनाने परिणाम केला आहे.
- राजेंद्र निकम,
मृताचे साहित्य विक्रेते