corona virus : नव्वदी पार केलेल्या लढवय्या दादांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 04:28 PM2020-09-11T16:28:34+5:302020-09-11T16:30:59+5:30
सुरूवातीपासून कणखरपणाने सर्व क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या माजी उद्योगमंत्री, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांनी वयाच्या ९० व्या वर्षी कोरोनावर मात केली. त्यामुळे आवाडे कुटुंबीयांसह समर्थकांतून आनंद व्यक्त होत आहे.
इचलकरंजी : सुरूवातीपासून कणखरपणाने सर्व क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या माजी उद्योगमंत्री, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांनी वयाच्या ९० व्या वर्षी कोरोनावर मात केली. त्यामुळे आवाडे कुटुंबीयांसह समर्थकांतून आनंद व्यक्त होत आहे. शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ‘इंदु-कला’ या त्यांच्या निवासस्थानी फुलांच्या पायघड्या अंथरुण फुलांचा वर्षाव करत भव्य स्वागत व औक्षण करण्यात आले.
इचलकरंजीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठा जनसंपर्क असलेल्या संपूर्ण आवाडे कुटुंबाला लागण झाली. सुरूवातीला आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र स्वप्निल आवाडे, त्यांचे पुत्र आदित्य आवाडे, तर उत्तम आवाडे यांची सून रेवती यांना लागण झाली होती. काही दिवसांतच खासगी रुग्णालयात उपचार घेवून त्यांनी कोरोनावर मात केली. त्यानंतर पुन्हा सर्व काही सुरळीत सुरू असताना दुसऱ्या टप्प्यात मात्र आमदार प्रकाश आवाडे यांना लागण झाली.
त्यानंतर तपासणी केली असता त्यांचे वडील माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, जवाहर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उत्तम आवाडे, इंदिरा महिला सूतगिरणीच्या माजी अध्यक्षा सपना आवाडे, जि.प.सदस्य राहुल आवाडे यांच्यासह कुटुंबातील बहुतांश सदस्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
या सर्वांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा होईल, तसे सर्वजण एकेक करत घरी परतले. आमदार प्रकाश आवाडे यांनीही चार दिवसांपूर्वी कोरोनावर मात करून पुन्हा समाजकार्यात सक्रिय झाले आहेत.
दरम्यान, कुटुंबातील प्रमुख व सर्वांचे आदरणीय असलेले माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आवाडे कुटुंबातील सर्वच सदस्यांनी कोरोनावर मात केली असून, संपूर्ण कुटुंबासह समर्थकांत आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.