corona virus : खाजगी रुग्णालये बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 03:13 PM2020-09-24T15:13:25+5:302020-09-24T15:16:12+5:30
भितीपोटी खाजगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
कोडोली- कोडोली ( ता. पन्हाळा ) येथे कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेवून भितीपोटी खाजगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. ग्रामसेवक ए वाय कदम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना दक्षता समितीची बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेणेत आला.
कोडोलीत सध्या कोरोना रूग्णाची संख्या दिवंसे दिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे सध्या ऊन पाऊस मुळे वातावरणात काही प्रमाणात बदल झाल्यामुळे नेहमीप्रमाणे अन्य थंडी,ताप, खोकला असणारे रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. कोडोलीतील ३५ खाजगी रुग्णालयापैकी काही रूग्णालये चालू आहेत. अन्य रुग्णालयाचे बाह्यरुग्ण विभाग चालू आहेत परंतु डॉक्टर जागेवर नसतात असे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली आहे.
सध्या कोरोनाच्या भितीपोटी डॉक्टरही क्वांरटाईन झाले आहेत. परंतु डॉक्टर किती दिवस क्वांरटाईन असणार असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे वैद्यकिय सेवा बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांना नोटीस देऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला.|
सध्या कोडोलीत कोरोना बाधिताची संख्या २६७ आहे तर १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोडोली ग्रापंचायत कार्यालयात तातडीने कोरोना दक्षता समितीची बैठक ग्रामविकास अधिकारी ए.वाय. कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत शिक्षक व अशा सेविका यांची १३ पथके नेमण्यात आली आहेत प्रत्येक कुटुंबाचा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लक्षणे दिसणाऱ्या लोकांनी तातडीने आपला स्वॅब तपासणीस द्यावा, तोंडावरती मास्क न लावणाऱ्या ग्राहकांना दुकानदारानी दुकानात प्रवेश देऊ नये याचाही निर्णय घेण्यात आला.
यावेळी माजी सरपंच शंकर पाटील ,नितीन कापरे ,माजी उपसरपंच निखील पाटील, तलाठी अनिल पोवार माणिक मोरे मानसिंग पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष निवास पाटील, व्यापारी असो.चे अध्यक्ष बाबासो पाटील, उपाध्यक्ष सूरज शहा, यासह कोरोना दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.